मुंबई : (Higher Education Maharashtra) विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आरोग्यसुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि सर्वांगीण विकासाला पूरक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी अतिशय संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठांना दिले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक पार पडली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उप सचिव अशोक मांडे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (ऑनलाइन) तसेच राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाइन उपस्थित होते. (Higher Education Maharashtra)
या बैठकीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या सूचना, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्यावर तातडीने आणि ठोस कार्यवाही करावी. आरोग्य सुविधांबाबत विशेष संवेदनशीलता दाखवून विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम कराव्यात. (Higher Education Maharashtra)
विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधा
“विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी कुलगुरूंनी नियमित संवाद साधावा. विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न आणि सूचनांची माहिती घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. या संवादातून समोर आलेल्या प्रश्नांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करावा,” अशा सूचनाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या. (Higher Education Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....