एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदी आशिष शेलार; मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देण्याचा निर्धार

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ५० टक्के सवलत

    18-Aug-2026   
Ashish Shelar ND Studio
 
मुंबई : (Ashish Shelar ND Studio) सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी, महाराष्ट्र शासनाने परिचालनासाठी घेतलेल्या कर्जत येथील एन. डी.स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत संचालक मंडळाचे ते पहिले अध्यक्ष ठरले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली एन. डी. स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. चित्रपट निर्मितीला अधिक चालना देणे, निर्मात्यांसाठी चित्रिकरणाचा खर्च कमी करणे आणि एन. डी. स्टुडिओचा प्रभावीपणे विकास करणे या दृष्टीने बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू , सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, तसेच महामंडळाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Ashish Shelar ND Studio)
एन. डी. स्टुडिओ हे चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा आणि वैविध्यपूर्ण स्थळांसाठी प्रसिद्ध असून, येथे मराठीसह हिंदी तसेच इतर भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेबसीरिज आणि विविध दृकश्राव्य निर्मितींच्या चित्रिकरणाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या पार्श्वभूमीवर निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.(Ashish Shelar ND Studio)
या निर्णयानुसार एन. डी. स्टुडिओतील थीम पार्कच्या प्रवेश शुल्कात, चित्रिकरणासाठी येणाऱ्या निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक व इतर मान्यवरांसाठी उपलब्ध निवासव्यवस्थेच्या शुल्कात तसेच चित्रिकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध स्थळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठी लागणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार असून, एन. डी. स्टुडिओमध्ये अधिकाधिक चित्रपट आणि दृकश्राव्य निर्मितींचे चित्रिकरण करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.(Ashish Shelar ND Studio)
महाराष्ट्रात चित्रिकरणाला मिळणार मोठी चालना
विशेषतः चित्रपट निर्मितीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्टुडिओ शुल्क, लोकेशन शुल्क आणि कलाकार व तंत्रज्ञांच्या निवासाचा खर्च हा निर्मिती बजेटमधील महत्त्वाचा भाग असतो. एन. डी. स्टुडिओच्या विविध सुविधांवर देण्यात आलेली ही सवलत निर्मात्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्रात चित्रपट निर्मितीसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्याबरोबरच राज्यात चित्रिकरणासाठी देशभरातील निर्मात्यांना आकर्षित करण्यास मदत होईल.(Ashish Shelar ND Studio)
 
महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, राज्यात मोठ्या प्रमाणावर चित्रिकरण आणणे आणि त्यातून स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, कामगार तसेच विविध सेवा क्षेत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील व्यापक उद्देश आहे.(Ashish Shelar ND Studio)
तसेच या निर्णयामुळे एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणाच्या संख्येत वाढ होऊन महाराष्ट्राला देशातील प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.(Ashish Shelar ND Studio)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर