नाशिकच्या ८४० कंपन्यांच्या ‘बंदी’चा अर्थ काय?; आकडेवारीचा वेगळा अर्थ समोर

‘८४० कंपन्या बंद, रोजगार धोक्यात’ असा सरसकट निष्कर्ष चुकीचा; केंद्राच्या डेटात बंद, विलीन, विसर्जित व नोंदणी रद्द करणे अशा नोंदींचा समावेश

    17-Aug-2026
Nashik Companies Closed
 
नाशिक : (Nashik Companies Closed) महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या लिक्विडेशन, विसर्जन किंवा रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्याची केंद्र सरकारची आकडेवारी समोर आल्यानंतर नाशिकमधील ८४० कंपन्यांचा आकडा सोशल मीडिया आणि काही वृत्तमाध्यमांमध्ये ‘८४० कंपन्या बंद पडल्या’ अशा अर्थाने चर्चेत आला. मात्र केंद्राच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीचा व्यापक संदर्भ पाहिल्यास या ८४० नोंदींचा थेट अर्थ ८४० सुरू असलेले उद्योग बंद पडले आणि त्यातून तेवढ्याच प्रमाणात रोजगार गेला, असा काढता येत नाही.
 
केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या Corporate Data Management Portalनुसार ३ जून २०२६ रोजी देशात ३१,४६,५५७ कंपन्या नोंदणीकृत असून त्यापैकी २१,१७,६४७ कंपन्या सक्रिय आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ३,९६,२११ सक्रिय कंपन्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्राचा औद्योगिक आणि कॉर्पोरेट पाया अद्याप देशातील सर्वात मोठ्यांपैकी आहे. (Nashik Companies Closed)
‘कंपनी बंद’ आणि ‘व्यवसाय बंद’ एकच नाही
 
या संपूर्ण चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे Corporate Register मधील ‘closed’ किंवा ‘struck off’ नोंद ही प्रत्यक्ष व्यवसाय बंद पडल्याची समानार्थी नोंद नाही. मंत्रालयाच्या अधिकृत वर्गीकरणात defunct, amalgamated, dissolved आणि strike-off अशा विविध श्रेणींचा समावेश होतो, मंत्रालयाच्या २०२५-२६च्या आकडेवारीनुसार बंद कंपन्यांच्या वर्गीकरणात ७६ टक्के defunct, १२ टक्के amalgamated आणि २ टक्के dissolved कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘हजारो उद्योग बंद पडले’ किंवा ‘त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात रोजगार गेला’ अशा सरसकट दाव्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. (Nashik Companies Closed)
 
नाशिकचा ८४०चा आकडा तरी काय सांगतो?
 
नाशिकच्या ८४० कंपन्यांची नोंद दुर्लक्षित करण्यासारखी नाही, मात्र त्याचा अर्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. या ८४० नोंदींपैकी किती कंपन्या प्रत्यक्ष उत्पादन किंवा सेवा देत होत्या, किती निष्क्रिय होत्या, किती कंपन्यांचे विलीनीकरण झाले आणि किती कंपन्या नियमानुसार रजिस्टरमधून वगळल्या गेल्या, याची स्वतंत्र वर्गवारी या चर्चेत समोर आलेली नाही, त्यामुळे ‘नाशिकमधील ८४० कंपन्या बंद झाल्या म्हणजे ८४० उद्योगांतील सर्व कर्मचारी बेरोजगार झाले’ असा निष्कर्ष अधिकृत आकडेवारीतून निघत नाही. रोजगारावर झालेला प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी कंपनीनिहाय कर्मचारी, उत्पादन, उलाढाल आणि बंद होण्याचे कारण यांचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक आहे. (Nashik Companies Closed)
 
महाराष्ट्रात नव्या कंपन्यांचीही मोठी भर
 
याच काळातील सकारात्मक चित्रही तितकेच महत्त्वाचे आहे. केंद्राच्या अधिकृत डेटानुसार २०१५-१६नंतर देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या सातत्याने वाढली असून २०२५-२६मध्ये सक्रिय कंपन्यांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत देशात ८ लाखांहून अधिक कंपन्यांची नोंदणी झाल्याचे मंत्रालयाच्या डेटामध्ये नमूद आहे. महाराष्ट्र हा नव्या कंपनी नोंदणीच्या बाबतीतही देशातील आघाडीचा राज्य आहे, त्यामुळे नाशिकच्या उद्योगविश्वाकडे पाहताना ८४० कंपन्यांच्या नोंदीबरोबरच सक्रिय उद्योगांची संख्या, नव्या कंपन्यांची नोंदणी, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती हे सर्व निर्देशांक एकत्र पाहणे गरजेचे आहे. (Nashik Companies Closed)
 
गैरसमजापेक्षा अचूक आकडेवारी महत्त्वाची
 
नाशिकसारख्या औद्योगिक जिल्ह्यासाठी काही कंपन्यांच्या बंद किंवा स्ट्राइक-ऑफ नोंदी हा अभ्यासाचा विषय निश्चितच आहे. मात्र त्यातून नाशिकचे उद्योगविश्व संकटात असल्याचा एकतर्फी निष्कर्ष काढण्यापेक्षा, प्रत्यक्ष सक्रिय उद्योगांची स्थिती आणि नव्या गुंतवणुकीची दिशा तपासणे अधिक वास्तववादी ठरेल. (Nashik Companies Closed)
 
मुख्य मुद्दे :
 
१. ८४० कंपन्यांची नोंद खरी; मात्र ती सर्व प्रत्यक्ष चालू उद्योग बंद पडल्याचे निदर्शक नाही
२. ७६% बंद नोंदी Defunct श्रेणीत
३. देशात २१.१७ लाख सक्रिय कंपन्या
४. महाराष्ट्रात ३.९६ लाख सक्रिय कंपन्या
५. महाराष्ट्र नव्या कंपनी नोंदणीत आघाडीवर
६. नाशिकच्या रोजगारावर प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी स्वतंत्र कंपनी निहाय आकडेवारी आवश्यक.
 
 




संबंधित मजकूर