मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शाहरुख खानसोबत केलंय काम! एका सीनसाठी घेतले होते तब्बल १७ टेक, फोटो होतोय व्हायरल.....
मराठी कलाविश्वाची लाडकी प्राजक्ता माळी आज अभिनय, सूत्रसंचालन आणि उद्योग क्षेत्रात आपलं नाव मोठ्या दिमाखात गाजवतेय. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील साधी-सुटसुटीत मुलगी ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारी दिलखुलास सूत्रसंचालक... प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.
पण, आपल्या या लाडक्या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत काम केलंय, हे तुम्हाला माहीत आहे काय?
'स्वदेस' चित्रपटातली ती छोटीशी झलक
ही गोष्ट आहे २००४ सालातली! आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित शाहरुख खानचा गाजलेला चित्रपट 'स्वदेस' तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातून प्राजक्ताने तिच्या अभिनय प्रवासाची पहिली पायरी चढली होती.
चित्रपटातील एका सीनमध्ये शाहरुख खान गायत्री जोशीच्या पाठोपाठ दुकानातून बाहेर पडतो, तेव्हा त्याची धडक दोन मुलींशी होते. त्या धडकणाऱ्या मुलींपैकी एक मुलगी म्हणजे आपली प्राजक्ता माळी!
किंग खानचं दडपण आणि तब्बल १७ टेक!
करिअरची नुकतीच सुरुवात झालेली... समोर साक्षात बॉलिवूडचा 'किंग खान'! त्यामुळे प्राजक्ता प्रचंड घाबरली होती आणि कमालीच्या दडपणाखाली होती.
याच भीतीमुळे, अवघ्या काही सेकंदांच्या त्या धडकण्याच्या सीनसाठी प्राजक्ताला तब्बल १७ टेक द्यावे लागले होते!
होय, ती मीच आहे!' – प्राजक्ताने शेअर केली आठवण
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सीनचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.
"शाहरुखसोबतचा हा एक दुर्मिळ फोटो... होय, ती मीच आहे!"
असे कॅप्शन देत तिने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला होता.
आज प्राजक्ताने स्वतःच्या मेहनतीवर, नजाकतीने आणि मराठमोळ्या अस्मितेने स्वतःचा 'प्राजक्तराज' ब्रँड उभा केलाय. मराठीतील अनेक कलाकारांची सुरुवात जरी अशा छोट्या भूमिकांनी झाली असली, तरी आज त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे!