डॉ. शिरीष देशपांडे यांचा जीवनसन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सोहळ्यासह जीवनगौरव प्रदान

    19-Jul-2026   
Shirish Gopal Deshpande
 
मुंबई : (Shirish Gopal Deshpande) मराठी साहित्य, शिक्षण आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल प्रख्यात लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांचा सन्मान सोहळा रविवार दि. १९ जुलै रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे सकाळी संपन्न झाला. या दिमाखदार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून आमदार पराग अळवणी, संगीतकार श्रीधर फडके, रवींद्र साठे, अविनाश नारकर, मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, माधुरी नाईक ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
 
सदर कार्यक्रमामध्ये अर्चना गोरे, मंदार आपटे, सान्वी देशपांडे, प्रशांत लळीत, ऊर्जा शिरीष देशपांडे, अभिषेक शिरीष देशपांडे आणि इतर अनेक मान्यवर कलाकारांनी केलेल्या विविधांगी कलात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून डॉ. शिरीष देशपांडे यांच्या शब्दसृष्टीचा जागर केला. या सोहळ्याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी जी यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांशी संवाद साधला.(Shirish Gopal Deshpande)
यावेळी ते म्हणाले की डॉ. शिरीष देशपांडे यांचं घर म्हणजे संघाच्या संस्कारांचं घर आहे. त्यांच्याशी माझा फार पूर्वीपासूनचा संबंध आहे. त्यांच्या कुटुंबियांनी केलेला त्याग अत्यंत महत्वाचा आहे. यावेळी संवाद साधताना पराग आळवणी म्हणाले की डॉ.शिरीष देशपांडे यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रतिभासंपन्न आहे. एक लेखक म्हणून ते थोर आहेतच, मात्र त्याचबरोबर जमिनीवरच्या राजकारणाची सुद्धा त्यांना जाण आहे.
 
चतुरस्त्र वाङ्मयीन प्रतिभेचा 'मंगल प्रवास'
 
बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या जीवनप्रवास सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुभसंदेश दिला ज्यात ते म्हणाले की डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या जीवन गौरव सोहळ्याचे आयोजन म्हणजे त्यांच्या चतुरस्त्र वाड्मयीन प्रतिभेचा रसस्वाद पुनः अनुभवण्याचा, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावस्पर्शी कार्यक्रम आहे.कथा, कादंबरी, कविता, समिक्षा तसेच दूरचित्रवाणीवर सादर झालेल्या लोकप्रिय मालिका गोट्या, राजा शिवछत्रपती चे सृजनात्मक लेखन त्यांनी केले. (Shirish Gopal Deshpande)
 
अनेक प्रकारच्या वाङ्गयीन व्यांख्यांची निश्चिती कथन करणारे 'रुपनिरुपण' हा तर साहित्य शारदेच्या चरणी अर्पण केलेला उत्तम अलंकार आहे. 'ये सखे ये' हा कवितासंग्रह प्रेम आणि कलेचे कालातीत प्रकाशमय जीवनार्थ तथा अनुभव प्रकट करणारा रसिकांना ऐहिक सुखाच्या पल्याड नेणारा सर्वोत्कृष्ट, तरल, संवेदी भावविश्व समृद्ध करणारा कविता संग्रह आहे.अशी सगळी प्रतिभा अंगी असतांना बालपणापासून झालेल्या संघाच्या संस्कारांचे सहज प्रगटीकरण ही त्यांच्या सामाजिक जीवनातून दिसून येते. (Shirish Gopal Deshpande)
 
'आधी वंदु कविश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर' अश्या सन्मित्र, बहुआयामी डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या जीवन प्रवासाचा सन्मान हा केवळ व्यक्तिचा गौरव नाही तर त्यांच्या गुणसमुच्चयांचा समाजात सकारात्मक परिणाम व्हावा या पावन हेतूने आयोजित एक मंगल प्रसंग आहे. गौरव सोहळ्यानिमित्त त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि निरामय स्वास्थ्य लाभासाठी विश्व मोहिनी श्री शारदा चरणी सविनय प्रार्थना.(Shirish Gopal Deshpande)
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर