‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ कार्यक्रमातून साकारणार पांडुरंगाच्या वारीचे विश्व, सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम; प्रवेश विनामुल्य

    10-Jul-2026   

Jhyacha Tyacha Vitthal Program
 
मुंबई (Jhyacha Tyacha Vitthal Program) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या चित्र-संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.
 
पांडुरंगाच्या वारीतील भक्तिभाव, संतपरंपरेचा आध्यात्मिक वारसा आणि चंद्रभागेच्या तीरावरील पावन वातावरणाचा कलात्मक अनुभव या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन डॉ. समीर कुलकर्णी यांनी केले असून दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे. संगीत संयोजन जयदीप वैद्य आणि निनाद सोलापूरकर यांनी केले आहे. कार्यक्रमातील चित्ररचना प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी साकारली असून प्रकाश योजनेची जबाबदारी सुजय भडकमकर यांनी सांभाळली आहे. साहित्य, संगीत, चित्रकला आणि रंगमंचीय सादरीकरण यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.  (Jhyacha Tyacha Vitthal Program)
 
 
सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अंजली मराठे, गजानन परांजपे, अमित वझे, पार्थ उमराणी, केतन पवार, स्वप्नील भावे, ओंकार जोशी, शौनक कुलकर्णी आणि मधुराणी गोखले हे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून वारकरी संप्रदायातील भक्ती, श्रद्धा, संतवाङ्मय आणि विठ्ठलभक्तीचे विविध पैलू रसिकांसमोर जिवंत होणार आहेत. चित्र, संगीत, निवेदन आणि रंगमंचीय अभिव्यक्ती यांचा प्रभावी मेळ साधणारा हा कार्यक्रम पंढरपूरच्या वारीतील अध्यात्मिक वातावरण, हरिनामाचा गजर आणि चंद्रभागेच्या ओलाव्याचा भावस्पर्शी अनुभव रसिकांपर्यंत पोहोचविणारा ठरणार आहे.  (Jhyacha Tyacha Vitthal Program)
 
प्रवेश विनामुल्य
 
या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून संगीतप्रेमी, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आगळ्यावेगळ्या चित्र-संगीतमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.  (Jhyacha Tyacha Vitthal Program)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर