मुंबई (BMC Dust Control Drive Mumbai): मुंबईतील वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम हाती घेतली आहे. २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेदरम्यान आतापर्यंत तब्बल ७७९.५५ टन बांधकाम व पाडकामातून निर्माण झालेला राडारोडा आणि ३६८.९१ टन धूळ संकलित करण्यात आली आहे.
मुंबईतील रस्त्यांवर साचणारी धूळ तसेच बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे. (BMC Dust Control Drive Mumbai)
या मोहिमेअंतर्गत मुंबईतील २६ प्रशासकीय विभागांमधील एकूण १४६ रस्त्यांची सखोल स्वच्छता केली जात आहे. यामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रमुख मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला जोडमार्ग (बीकेसी कनेक्टर), सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्ग (एससीएलआर), पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोडमार्ग (जेव्हीएलआर), घाटकोपर-मानखुर्द मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड), लिंक रोड, कार्टर रोड आणि शीव-मानखुर्द मार्गांचा यात समावेश आहे. (BMC Dust Control Drive Mumbai)
याशिवाय विविध विभागांतील धूळप्रवण रस्ते आणि परिसरांमध्येही स्वच्छता व धूळ नियंत्रणाची कामे केली जात आहेत. रस्त्यांची झाडलोट, स्क्रॅपिंग, रस्त्यांच्या कडेला साचलेली धूळ आणि गाळ हटविणे, दुभाजक व पदपथांची स्वच्छता तसेच कर्ब स्टोन परिसरातील धूळ काढण्यावर भर दिला जात आहे. (BMC Dust Control Drive Mumbai)
९६६ कर्मचारी आणि ८८ यंत्रसामग्री तैनात
या विशेष मोहिमेसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री तैनात केली आहे. एकूण ९६६ स्वच्छता कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक या कामात सहभागी झाले आहेत. तसेच १६ जेसीबी, १९ डंपर, १९ बहुउद्देशीय मिस्टिंग मशीन, २२ मेकॅनिकल पॉवर स्वीपर, ५ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर आणि ७ दुभाजक स्वच्छता यंत्रांचा वापर केला जात आहे. अशा एकूण ८८ यंत्रांच्या साहाय्याने रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात येत आहे. (BMC Dust Control Drive Mumbai)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.