राज्यातील दुष्काळग्रस्त भागांत तात्काळ आरोग्यसुविधा! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही; वैद्यकीय अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती!

 
Maharashtra CM Relief Fund Taluka Level Expansion
मुंबई (Maharashtra CM Relief Fund Taluka Level Expansion) : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्यविषयक मदत आणि वैद्यकीय उपचार वेळेत मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची व्याप्ती आता तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
 
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि.६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या सर्व तालुक्यांमध्ये हा कक्ष स्थापन केला जाणार आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीची यंत्रणा थेट तालुका स्तरापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात हा कक्ष सुरू करण्यात येईल. जिल्हाधिकारी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करतील. त्यांच्या मदतीसाठी लिपिक आणि टंकलेखक उपलब्ध करून दिले जातील. आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. (Maharashtra CM Relief Fund Taluka Level Expansion)
 
गरजू रुग्णांना उपचारांसाठी सर्वप्रथम आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार विभागाच्या आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. या योजनांसाठी पात्र नसलेल्या रुग्णांचे अर्ज संलग्न रुग्णालयांमार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येतील. यासाठी तालुकास्तरीय कक्ष रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहे.
 
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर आरोग्य समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार असतील, तर उपविभागीय अधिकारी सहअध्यक्ष म्हणून काम पाहतील. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी समितीचे सदस्य असतील. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री, सहअध्यक्ष जिल्हाधिकारी, तर जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असतील. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील दोन समाजसेवकांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश केला जाणार आहे. दोन्ही समित्यांना महिन्यातून किमान दोन बैठका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा कक्ष सर्व तालुक्यांचे अहवाल एकत्रित करून मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे पाठवेल. (Maharashtra CM Relief Fund Taluka Level Expansion)
 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल परिषद आणि खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले जातील. दुर्गम भाग, मोठी लोकसंख्या असलेले परिसर आणि आरोग्य सुविधांची कमतरता असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाणार आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सहायता निधीची यंत्रणा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुकास्तरावर कक्ष सुरू झाल्यामुळे गरजू रुग्णांची वेळेत माहिती मिळेल आणि त्यांना योग्य उपचारांसह आर्थिक मदत उपलब्ध करून देणे शक्य होईल. कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. - रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (Maharashtra CM Relief Fund Taluka Level Expansion)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर