मुंबई (Eknath Shinde Diwali event): ज्या मुलांच्या आयुष्यात कधीकाळी अंधार होता, ज्यांना ऐकता येत नव्हते, बोलता येत नव्हते, तर काहींच्या हृदयात जन्मापासूनच छिद्र असल्याने त्यांच्या जगण्याची चिंता पालकांना सतावत होती, अशा चिमुकल्यांच्या आयुष्यात आज नव्या आशेचे, आनंदाचे रंग फुलले आहेत. याच मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवताना दिवाळीचा सण एका वेगळ्याच भावविश्वात साजरा झाला. मात्र, या आनंदामागचा संघर्ष आणि पालकांनी सोसलेल्या वेदना जेव्हा त्यांच्या शब्दांतून उलगडल्या, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. पालकांचे अनुभव ऐकताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. एकेकाळी मुलांच्या भविष्याची चिंता करणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर आज उमटलेले समाधान पाहून हा स्नेहमेळावा भावनांनी ओथंबून गेला.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाला आवश्यक शस्त्रक्रियेपासून वंचित राहावे लागणार नाही. कॉक्लिअर इम्प्लांट, हृदयशस्त्रक्रियांसह प्रलंबित असलेल्या एक हजार शस्त्रक्रियांचा टप्पा तातडीने पूर्ण केला जाईल. श्रीनगरमधील ७२ बालकांच्या शस्त्रक्रियांची जबाबदारीही स्वीकारली असून त्यांच्या उपचारांत कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Eknath Shinde Diwali event)
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने हृदयशस्त्रक्रिया आणि कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या बालकांसह त्यांच्या पालकांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या पुढाकारातून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११ कुटुंबांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष, मुलांच्या आजाराचे निदान झाल्यापासून उपचारांपर्यंतचा प्रवास आणि शस्त्रक्रियेनंतर पाल्यांच्या आयुष्यात झालेला बदल कथन केला. मुलाला ऐकू येत नाही, बोलता येत नाही किंवा त्याच्या हृदयात छिद्र आहे, हे समजल्यावर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकते. आपल्या मुलाचे पुढे काय होणार, त्याचे आयुष्य कसे असेल, या असंख्य प्रश्नांनी पालकांचे आयुष्य व्यापून जाते. या वेदना शब्दांत मांडणेही कठीण आहे, असे सांगताना शिंदे भावुक झाले. (Eknath Shinde Diwali event)
यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी संकटाची असली, तरी या बालकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही वेगळाच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मुलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केलेले काम अत्यंत मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी दोघांचेही विशेष कौतुक केले. (Eknath Shinde Diwali event)
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन आणि मंगेश चिवटे यांची वैद्यकीय मदतनिसांची टीम गेली नऊ वर्षे अविरतपणे रुग्णसेवा करत आहे. रुग्णाचे निदान करण्यापासून रुग्णालयात दाखल करणे, शस्त्रक्रियेची व्यवस्था, गरजेनुसार एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा आणि उपचारांनंतर नियमित फॉलोअपपर्यंतची संपूर्ण जबाबदारी ही टीम पार पाडते. या मदतीमुळे केवळ मुलांचे आरोग्य सुधारले नाही, तर त्यांच्या आयुष्यालाच नवी दिशा मिळाली आहे. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर एका मुलीची आयआयटीमध्ये, तर दुसऱ्या मुलाची इस्रोमध्ये निवड होणे, ही या उपचारांच्या यशाची आणि मुलांच्या जिद्दीची मोठी पावती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde Diwali event)
कॉक्लिअर इम्प्लांटचा अनुभव शब्दबद्ध करत आदित्य ठोसर याने 'माय वर्ल्ड ऑफ साऊंड' हे पुस्तक लिहिले आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या मुलांनी सादर केलेल्या नाटकाचेही त्यांनी कौतुक केले. या मुलांमध्ये असलेले कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde Diwali event)
ठाणे महापालिका क्षेत्रात यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांची मदत देऊन महागड्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ठाण्यात सुरू झालेली अर्ली डिटेक्शनची व्यवस्था इतर महापालिकांमध्येही सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लिव्हर ट्रान्सप्लांट, कॅन्सर उपचारांसह संपूर्णपणे कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध असलेली रुग्णालये ठाण्यात उभारण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde Diwali event)
मात्र, या स्नेहमेळाव्याची खरी आठवण ठरली ती शस्त्रक्रियेनंतर नव्याने आयुष्य अनुभवणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यांत तरळलेले कृतज्ञतेचे अश्रू. कधीकाळी मुलांच्या भविष्याची चिंता करत मदतीसाठी धडपडणाऱ्या पालकांच्या आयुष्यात आज आशेचा नवा प्रकाश आला आहे. त्यांच्या संघर्षाला मिळालेला हा दिलासा आणि मुलांच्या आयुष्यात फुललेले नवे विश्व, हीच या दिवाळी स्नेहमेळाव्याची खरी भेट ठरली. (Eknath Shinde Diwali event)