गोकुळवर कब्जा करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही! दोन्ही गटांकडे कोरमसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने वैधानिक पेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण!
मुंबई (Devendra Fadnavis on Gokul Cooperative Society Dispute) : गोकुळवर कब्जा करण्याचा राज्य सरकारचा कोणताही हेतू नसून, संस्थेच्या अध्यक्ष निवडीतील वैधानिक पेच दूर करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दोन्ही गटांनी एकत्र बसून तोडगा काढल्यास सरकारला हस्तक्षेप करण्याची गरजच पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
गोकुळच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीसाठी निश्चित करण्यात आलेल्या पहिल्या तारखेला एका गटाचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने कोरमअभावी निवडणूक होऊ शकली नाही. त्यानंतर न्यायालयाने १० तारखेला निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. मात्र, त्या दिवशीही कोरम पूर्ण न झाल्यास निवडणूक कोरमशिवाय घ्यावी, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. परिणामी पुन्हा निवडणूक रखडण्याची शक्यता आहे. गोकुळच्या कायद्यानुसार सलग तीन वेळा अशा प्रकारे निवडणूक होऊ न शकल्यास जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर) अधिकार जाण्याची तरतूद असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis on Gokul Cooperative Society Dispute)
गोकुळच्या प्रश्नाला राजकीय रंग देणे योग्य नसल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सतेज पाटील यांनी आपापसांत चर्चा करून निर्णय घ्यावा. सरकारला कोणत्याही विशिष्ट गटाला पाठविण्यात किंवा संस्थेचा ताबा घेण्यात स्वारस्य नाही. ही सुमारे ५१ हजार मतदार असलेली जिल्हास्तरीय सहकारी संस्था आहे. तिच्या निवडणुकीचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होत नाही. त्यामुळे सरकार गोकुळसाठी आतुर आहे, असे समजण्याचे कारण नाही. (Devendra Fadnavis on Gokul Cooperative Society Dispute)
शिवसेनेला विश्वासात न घेतल्याच्या आरोपांवरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वैधानिक पेच सरकारच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर महाधिवक्त्यांचे मत घेण्यात आले. विधी व न्याय विभागाशी चर्चा करण्यात आली. तिघांच्या सहमतीने हा प्रस्ताव पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. वैधानिक पेच नसेल तर शासन कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis on Gokul Cooperative Society Dispute)
गोकुळचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर फडणवीस यांनी टीका केली. एखाद्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीलाही राष्ट्रीय मुद्दा बनवण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. या विषयात सरकारला राजकारण करायचे नसून, वैधानिक जबाबदारी पार पाडणे हाच उद्देश असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
गोकुळबाबतचा सरकारी निर्णय न्यायालयात टिकणार नसल्याचे मत व्यक्त झाल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, भूषण गवई यांनी दिलेले मत सतेज पाटील यांनी सादर केलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे होते. त्या मताच्या शेवटच्या परिच्छेदात उपलब्ध करून दिलेल्या तथ्यांच्या आधारेच मत व्यक्त केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दोन्ही गटांकडे कोरम पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसणे आणि कोरमअभावी निवडणूक होऊ न शकणे, या बाबी संबंधित मतासमोर आणण्यात आल्या नव्हत्या, असा दावा त्यांनी केला. मात्र, या प्रकरणात न्यायालय काय निर्णय घेईल, यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis on Gokul Cooperative Society Dispute)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.