ज्येष्ठ स्वयंसेवक अनंत परशुराम बेडेकर कालवश

    07-Nov-2026   
 
Anant Parshuram Bedekar
 
मुंबई (Anant Parshuram Bedekar) : गोवंडी नगरातील ज्येष्ठ स्वयंसेवक अनंत परशुराम बेडेकर यांचे शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी प्रांजली बेडेकर आणि जावई संजय मराठे असा परिवार आहे. मुळचे बडोद्याचे असलेले अनंतराव १९६६ मध्ये मुंबई उपनगरात गोवंडीत आले. संघसंकारात वाढलेल्या बेडेकरांनी संघविचारांच्या सामाजिक शैक्षणिक संस्थांमध्ये योगदान दिले. स्व. हशू आडवाणी, सौरभ मुजुमदार यांच्या सोबत त्यांनी कार्य केले होते.
 
गोवंडी उपनगरात येऊन अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करत एक स्वतःचा छोटा व्यवसाय त्यांनी निर्माण केला होता. नव्वदच्या दशकात गोवंडीसारख्या तुलनेने दुर्लक्षित परिसरात आपल्या छोट्या-मोठ्या सामाजिक योगदानातून अनंतरावांनी सतत लोकांमध्ये वावरत राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसंस्कारांत घडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व संघप्रेरित सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले. (Anant Parshuram Bedekar)
 
१९९५ साली स्थापन झालेल्या ‘रंगसंगती’ या सांस्कृतिक व्यासपीठाचे ते संस्थापक कार्यवाह होते. रंगसंगतीच्या माध्यमातून गोवंडीत आयोजित करण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या शोभायात्रेच्या आयोजनात त्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. त्या वेळी सळसळत्या तरुणाच्या उत्साहाने ते प्रत्यक्ष कामात झोकून देऊन कार्यरत होते. शोभायात्रेची भव्यता, तिचे यश आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांच्या चेहऱ्यावर दाटून आलेले समाधान आजही डोळ्यांसमोर तरळते.
 
गोवंडी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये छोटे-मोठे मतभेद आणि वाद उद्भवत असत. अशा वेळी पुढाकार घेऊन ते मिटविण्याची जबाबदारी अनंतराव स्वतःहून स्वीकारत. व्यापाऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यात समन्वय आणि संघभावना निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘गोवंडी व्यापारी मंडळा’ची स्थापना केली. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी सलग सहा वर्षे काम पाहिले. व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्यातील मतभेद दूर करणे आणि सामूहिक हितासाठी सर्वांना एका व्यासपीठावर आणणे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विशेष म्हणजे, संस्थेला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून न ठेवता तिचे नेतृत्व पुढील पिढीकडे सोपविण्याची वेळ आल्यावर त्यांनी स्वेच्छेने पदभार तरुण कार्यकर्त्यांकडे दिला आणि स्वतःहून बाजूला झाले. पदापेक्षा कार्य आणि व्यक्तीपेक्षा संस्था मोठी मानणाऱ्या त्यांच्या विचारांचे हे उत्तम उदाहरण होते. (Anant Parshuram Bedekar)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर