गावागावांत मिळणार कौशल्य प्रशिक्षण! ३०० चौ. फुटांच्या जागेत सुरू होणार ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र'; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ!

    05-Nov-2026   
 
Mahatma Jyotiba Phule Skill Training Centre
 
मुंबई (Mahatma Jyotiba Phule Skill Training Centre) : युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास विभागाने ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ योजना सुरू केली आहे. गुरुवारी मेट्रो चौक येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष हॉल येथे महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास योजनेचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न झाले. या योजनेचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण गावागावांत आणि वस्तीवस्तीपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
 
या योजनेंतर्गत केवळ ३०० चौ. फुटांच्या जागेत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील १०० केंद्रांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली. त्यापैकी १२ केंद्रांचे उद्घाटन झाले. (Mahatma Jyotiba Phule Skill Training Centre)
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र हा भारतातील पहिला उपक्रम आहे. राज्यातील झोपडपट्टी, दुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागांतील गरजू युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जागेच्या निकषांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, आता किमान ३०० ते १५०० चौरस फूट जागेतही प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार आहे. नागपुर, डहाणू-पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि जळगाव या जिल्ह्यात १२ केंद्रांचे उद्घाटन झाले." (Mahatma Jyotiba Phule Skill Training Centre)
 
"२०२६ हे वर्ष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्याचे औचित्य साधत, या अभियानांतर्गत स्थापन होणाऱ्या सर्व कौशल्य विकास केंद्रांना ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या गावी या उपक्रमाची घोषणा केली. महात्मा फुले यांच्या व्यावसायिक शिक्षणाच्या विचारांना अनुसरून युवकांना आधुनिक बाजारपेठेच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
ग्रामीण युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्राधान्य
 
ते पुढे म्हणाले की, "यापूर्वी कौशल्य प्रशिक्षण केंद्रांसाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. मात्र, आता किमान ३०० चौ. फुटांच्या जागेत प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार असल्याने स्थानिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. उपलब्ध स्थानिक पायाभूत सुविधांचा प्रभावी उपयोग करून कौशल्य प्रशिक्षणाचा विस्तार करणे शक्य होणार आहे. विशेषतः झोपडपट्ट्या, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रे, दुर्गम आणि डोंगराळ भाग, नक्षलग्रस्त क्षेत्रे, आदिवासी भाग तसेच ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गावठाण, आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यांपर्यंत प्रशिक्षण सुविधा पोहोचवून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना रोजगारक्षम बनविण्याचा शासनाचा मानस आहे." (Mahatma Jyotiba Phule Skill Training Centre)
 
रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
 
"या केंद्रांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणपत्र आणि रोजगार यांची परिणामकारक सांगड घालण्यावर भर देण्यात येणार असून, प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही," असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
 
कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर
 
नामांकित सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांसाठी कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील कौशल्य प्रशिक्षणाच्या उपलब्धतेतील तफावत कमी करणे, आर्थिक समावेशनाला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून युवकांना आत्मनिर्भर बनविणे, हा या योजनेचा व्यापक दृष्टिकोन आहे. (Mahatma Jyotiba Phule Skill Training Centre)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर