मुंबई : आम्ही भारताचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. काहीही झाले तरी जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही, लोकशाहीवर संकट येऊ देणार नाही. ही पदयात्रा म्हणजे अंत नाही आहे. जोपर्यंत रेजिम चेंजचे, संविधान बदलाचे इरादे नेस्तनाबूत होत नाही, जोपर्यंत पर्यंत हे इरादे आम्ही पायथळी तुडवत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील आणि तोपर्यंत एनडीएचा प्रत्येक कार्यकर्ता आणि देशातला देशभक्त नागरिक हा रस्त्यावर येऊन मुकाबला करेल. ही लढाई भाजप, एनडीएची नसून ही लढाई देशाच्या संविधानाची लढाई आहे, असा एल्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सोमवारी, भाजप-महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते कामगार कल्याण मंडळ मैदान येथे ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ या अभियानांतर्गत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री नितेश राणे, भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Devendra Fadnavis Constitution Statement)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज आपण लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. काँग्रेस आणि त्यांचे कच्चेबच्चे रोज षडयंत्र करतात, मोर्चे काढतात. त्यांचा मोर्चा सरकार चेंज नसून रेजिम चेंज असा आहे. रेजिम चेंजचा अर्थ राजकीय व्यवस्था, संविधानिक संस्था बदलायचा असा होतो. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका इथे रेजिम चेंज झाले आणि संविधान बदलले. उद्धव ठाकरेंना रेजिम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही ते माहिती नाही पण तेसुद्धा आम्हाला रेजिम चेंज करायचे आहे असे म्हणतात." (Devendra Fadnavis Constitution Statement)
काँग्रेसचे मनसुबे जुनेच
"काँग्रेसचा हे मनसुबे आजचे नाहीत. काँग्रेसने वारंवार देशाच्या लोकशाहीला पायदळी तुडवण्याचे काम केले. १९७५ ला अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली. त्या प्रधानमंत्री होत्या, त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, इंदिरा गांधींना पंतप्रधान राहता येईल पण लोकसभेत बोलता येणार नाही. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने पाशवी बहुमताच्या आधारे संविधान संशोधन केले आणि सांगितले की, प्रधानमंत्री संविधानाच्या वर आहे. १९७६ ला ४२ वी घटना दुरुस्ती आणून काँग्रेस पक्षाने मूलभूत अधिकार गोठवले आणि संविधानात संशोधन करून सांगितले की, जर मूलभूत अधिकारावर घाला आला तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयात जाताच येणार नाही. पुढे १९७७ ला मोरारजी भाई, अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा संविधान संशोधन केले आणि सांगितले की, बाबासाहेबांनी केले तेच योग्य होते. त्यांनी संविधान संशोधन करून देशाच्या प्रधानमंत्र्याला पुन्हा संविधानाच्या अंतर्गत आणले," असे त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis Constitution Statement)
तुम किस खेत की मुली हो?
ते पुढे म्हणाले की, "आता पुन्हा त्याच पद्धतीचे काम इंदिरा गांधी यांच्या नातवाने सुरू केले आहे. आता केवळ यांनी नीती रीती बदलली आहे आता एका हातात लाल संविधान घेतात आणि दुसऱ्या हातात लाल पुस्तक आहे. हे तेच लाल पुस्तक आहे ज्या लाल पुस्तकाने श्रीलंका, बांगलादेश पाकिस्तान आणि नेपाळमध्ये रेजिम चेंज केली. हे तेच लाल पुस्तक आहे जे फ्रान्समध्ये डेनम्मार्क मध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये अराजक तयार करत आहे. त्याच लाल पुस्तकाचा उपयोग यांनी सुरू केला. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दाखवायचा आतमध्ये काहीच नाही आणि दुसरीकडे त्याच संविधानाने तयार केलेल्या संस्थांना बदनाम करायचे. आता यांनी संविधानाने तयार केलेली एक एक संस्था खराब आहे असे सांगणे सुरु केले. काँग्रेसला बांगलादेश आणि नेपाळसारखी अति डावे सरकार आणायचे आहे. पण राहुल गांधींना लोकशाही व्यवस्था माहिती नाही.हे नेपाळ, बांगलादेश नसून बाबासाहेबांचे संविधान असलेला भारत आहे. राहुल गांधी, तुमच्या आजीनेही संविधान संपवण्याचा प्रयत्न केला. त्या नेत्या होत्या पण त्या संविधान संपवू शकल्या नाहीत तुम किस खेत की मुली हो?" (Devendra Fadnavis Constitution Statement)
"राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागत नाही पण न्यायालयावर मोर्चा काढतात. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडले. त्यावेळी स्वत:ला विचारवंत म्हणणाऱ्या काही बाजारु विचारवंतांच्या तोंडून राहुल गांधींच्या विरोधात एकही शब्द निघाला नाही. हे लोक पोपटासारखे मोदी विरोध करतात, पण लोकशाही खतऱ्यात गेल्यानंतर बोलत नाहीत. आता हे रोज सांगणार लोकशाहीने तयार केलेली सगळ्या संस्था बरबाद आहेत. लोकशाहीची एकही संस्था तुम्हाला न्याय देत नसेल तर त्या संस्था मोडून टाका म्हणजे भारताचे संविधान मोडून टाका, असे त्यांचे पुढचे वाक्य असेल. मोदीजींच्या मागे पूर्ण देश आहे. यांनी कितीही टिवटिव केली तर मोदींना फरक पडत नाही. त्यांची लढाई भाजप, एनडीए किंवा मोदींशी नसून देशाच्या संविधानाशी आहे. ज्यांना वाटते हे संविधान वाचले पाहिजे त्यांनी या लढाईत उडी घ्यावी," असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. (Devendra Fadnavis Constitution Statement)
ही पदयात्रा कुठल्या पक्षाला मत मागण्यासाठी नाही, पक्षाचे चिन्ह टिकवण्यासाठी किंवा दबावतंत्र टाकण्यासाठी नाही, मुलाला लाँच करण्यासाठी नाही तर, ही पदयात्रा लोकतंत्र बचाओ अराजकता हटाओ साठी आहे. या पदयात्रेसाठी योग्य योग्य निवडली आहे. काँग्रेस, उबठा, मनसे यांचा संविधानाशी काय संबंध? यांनी सर्वात जास्त संविधानाचा अपमान केला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला. उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कधी गेले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक मार्ग सोडून जे आंदोलने केली जातील त्याचे वर्णन अराजकतेचे व्याकरण असे केले. काँग्रेस, मनसे, उबाठा, अन्य पक्ष हे सगळे बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या विचाराविरोधी आहे. त्यामुळेच मुंबईकर आज रस्त्यावर उतरला आहे. - मंत्री आशिष शेलार
१९४७ मध्ये जे काम जिन्नाने केले ते आता राहुल गांधी करत आहेत. जिन्नाप्रमाणेच अराजकतेचे वातावरण तयार करण्याचे काम राहुल गांधी आणि त्यांची गँग करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ च्या विकसित भारताचा आराखडा तयार करून त्यादृष्टीने काम सुरु केले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आज देशभक्त नागरिकांनी एकजुटीने उभे राहावे. ही लढाई कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून भारताची लोकशाही आणि संविधानिक मूल्ये जपण्याची आहे. - मंत्री मंगलप्रधात लोढा
"ही पदयात्रा संविधान वाचवण्यासाठी आणि देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्यापासून रोखण्यासाठी महत्वाची आहे. ही लढाई संविधान विरुद्ध शरियाची आहे. इंडिया आघाडीची भाषा आणि पाकिस्तानच्या भाषेत काहीही फरक नाही. राहुल गांधी आणि इंडी आघाडीचे नेते पाकिस्तानची स्क्रिप्ट वाचतात आणि आपल्या देशाला २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इंडी आघाडीच्या कुठल्याही मोर्चात 'अल्लाहु अकबर' आणि 'सर तन से जूदा' ऐकायला मिळेल. ही घाण बाहेर काढायची असल्यास याच ताकदीने एकत्र यावे लागेल." - मंत्री नितेश राणे
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....