नवी मुंबई (CIDCO Lottery Results 2026) : सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेतील बिगर-ईडब्ल्यूएस (Non-EWS) प्रवर्गातील ८,०८१ सदनिकांची संगणकीय सोडत शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) यशस्वीरित्या पार पडली. या सोडतीमुळे तब्बल ५,४२४ यशस्वी अर्जदारांच्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) १.० अंतर्गत डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेतील सदनिका तळोजा, पनवेल, कामोठे, खारघर, वाशी आणि उलवे या नवी मुंबईतील विविध विकसित व विकसनशील नोडमध्ये उभारण्यात येत आहेत. शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर परवडणाऱ्या आणि दर्जेदार घरांची गरज लक्षात घेता ही सोडत सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.(CIDCO Lottery Results 2026)
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांच्या हस्ते ही संगणकीय सोडत काढण्यात आली. याप्रसंगी मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) श्रीनिवास मोकलीकर, एनआयसीचे संचालक लक्ष्मीकांत गर्जे आणि नरेंद्र भामरे उपस्थित होते.
अर्जदारांच्या सोयीसाठी आणि प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सिडकोने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करून, योजनेत पुढे सहभागी न होण्याची इच्छा असलेल्यांना १० दिवसांत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागे घेण्याचा अथवा दावा सोडण्याचा पर्याय दिला होता. त्यासाठी लॉगिनमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. निर्धारित मुदतीत ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्ज माघारीच्या विनंतींचा या सोडतीसाठी विचार करण्यात आला नाही.(CIDCO Lottery Results 2026)
प्रमाणित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संपूर्ण नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आल्याने अर्जदारांमध्ये विश्वास वृद्धिंगत झाला आहे. दर्जेदार गृहसुविधांसह आधुनिक जीवनशैली नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सिडको प्रयत्नशील असून, या सोडतीमुळे हजारो कुटुंबांच्या हक्काच्या निवाऱ्याची आस पूर्ण होण्याच्या दिशेने ठोस वाटचाल झाली आहे.(CIDCO Lottery Results 2026)