भारतमातेच्या जयघोषासाठीच स्वयंसेवकांचे जीवन समर्पित; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख रामलालजी यांचे प्रतिपादन!

    23-Nov-2026   
 
 
RSS Training Camp Nagpur
 
मुंबई (RSS Training Camp Nagpur) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय (विशेष)चे उद्घाटन रविवारी सकाळी नागपुरातील स्मृतिभवन परिसरातील संत शिरोमणी रविदास सभागृहात झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख आणि या वर्गाचे पालक अधिकारी रामलालजी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संघाचे स्वयंसेवक कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या जयजयकारासाठी काम करत नाहीत, तर केवळ ‘भारतमाता की जय’ या ध्येयासाठी आयुष्यभर कार्यरत असतात. कारण देश आणि समाजाचा विचार करणारे नागरिक घडवणे, हेच संघाचे कार्य आहे, असे प्रतिपादन रामलालजी यांनी केले.
 
या उद्घाटनप्रसंगी मंचावर सहसरकार्यवाह मुकुंदजी तसेच वर्गाचे सर्वाधिकारी आणि छत्तीसगड प्रांत संघचालक डॉ. टोपलाल वर्मा उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन केल्यानंतर संघटनमंत्राने वर्गाचा औपचारिक प्रारंभ झाला. देशभरातून ५०० शिक्षार्थी या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले आहेत. हा वर्ग १६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. (RSS Training Camp Nagpur)
 
रामलालजी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी दूरदृष्टीने संघाची स्थापना केली. इंग्रजी सत्तेविरोधात देशभर सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित होते. मात्र, भविष्यात देशावर पुन्हा अशी परिस्थिती ओढवू नये, या उद्देशाने संघाची स्थापना करण्यात आली. राष्ट्राला अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान, संपूर्ण समाजात एकात्मतेची भावना आणि कोणताही भेदभाव नसलेला ‘भारतमाता की जय’ हा एकमेव समान धागा समाजात असला पाहिजे, ही बाब डॉ. हेडगेवार यांनी ओळखली होती. त्यामुळे संघाची रचनाही याच विचारातून करण्यात आली. (RSS Training Camp Nagpur)
 
संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासात अनेक संकटे आली. तीन वेळा संघावर बंदी घालण्यात आली, तरीही स्वयंसेवक विचलित झाले नाहीत. स्वयंसेवकांची कर्मठता, निष्ठा आणि जिद्द यांमुळेच संघाचा आज इतका विस्तार झाला आहे. संघाची कार्यपद्धती काळानुसार हळूहळू विकसित होत गेली. त्यामध्ये परिस्थितीनुसार आवश्यक बदल होत असले, तरी संघाचा मूळ विचार आजही कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (RSS Training Camp Nagpur)
 
प्रशिक्षण वर्गाचे महत्त्व विशद करताना रामलालजी म्हणाले, की येथे सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना संघाची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता या वर्गात नेमके नवीन काय शिकायचे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र, संघाच्या विचारांची सखोलता समजून घेण्यासाठी आणि त्या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाशी संबंधित प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास व्हावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. हे प्रशिक्षण म्हणजे एक प्रकारची साधनाच आहे. प्रशिक्षण योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी दृढ संकल्प असणे आवश्यक आहे. पुढील २५ दिवस स्मृतिमंदिराच्या या पवित्र परिसरात प्रशिक्षण घेऊन आपण भारतमातेच्या सेवेसाठी अधिक सक्षम होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (RSS Training Camp Nagpur)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर