मुंबई (Rahul Narwekar Sanjay Raut): अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील कातकरी आदिवासी कुटुंबाच्या जमिनी बळकावल्याचा गंभीर आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कथित जमीन व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हात्रोळी गावातील सुमारे २० आदिवासी कुटुंबांची घरे मार्च २०२४ मध्ये पाडण्यात आल्याचा आणि त्यांना विस्थापित करण्यात आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नीच्या नावावर जमीन खरेदी झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संबंधित जमीन व्यवहारांची चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच विस्थापित आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. (Rahul Narwekar Sanjay Raut)
आरोपांमध्ये तथ्य नाही; कायदेशीर कारवाई करणार
संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राहुल नार्वेकर यांनी हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. जुन्या हिशोबातून आणि सूडभावनेतून हे आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. राऊत यांना सकाळी उठून मनात येईल ते बोलण्याची सवय झाली असून, अशा आरोपांचे परिणाम भोगावे लागत नसल्याने ते वारंवार असे वक्तव्य करतात, अशी टीका नार्वेकर यांनी केली. (Rahul Narwekar Sanjay Raut)
या प्रकरणाची माहिती घेतल्याचे सांगताना नार्वेकर म्हणाले की, २०२४ मध्ये काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन जमीनमालक आणि स्थानिक नागरिकांशी संबंधित बाबींची चौकशी झाली होती. तहसीलदारांनी अहवाल दिला असून, आदिवासी बांधवांनी आपल्या जबाबांमध्ये मोबदला मिळाल्याचे नमूद केले आहे. २०२४ मध्येही माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतीही तक्रार नव्हती आणि आजही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Rahul Narwekar Sanjay Raut)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.