मुंबई (Kurla Mob Lynching Protest) : कुर्ल्यातील फिनिक्स मॉल परिसरातील प्रमोद महाजन उद्यानात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी आक्रोशित हिंदू संघटनांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुर्ला पश्चिम येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयाबाहेर सकल हिंदू समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
उद्यान परिसरात तरुण-तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महानगरपालिका अधिकाऱ्यांना सादर केले. (Kurla Mob Lynching Protest)
"जोपर्यंत महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून ठोस आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील," असा इशाराही आंदोलकांनी दिला. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी महानगरपालिका कार्यालयाबाहेर धरणे धरत हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले.
यावेळी आंदोलकांनी उद्यान परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित केला. "मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच, उद्यान परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक चोख करण्यात यावी. या उद्यानात आमची मुले-मुली खेळण्यासाठी जातात. यापूर्वीही वारंवार तक्रारी करूनदेखील पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही," असा आरोप संतप्त आंदोलकांनी केला. (Kurla Mob Lynching Protest)
१५ दिवसांत मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चाचा इशारा
यावेळी एका महिला आंदोलकाने तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. "उद्यानात येणाऱ्या तरुणांवर जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून मारहाण केली जाते आणि हिंदूंना वारंवार त्रास दिला जातो. आजचा मोर्चा केवळ एल विभाग कार्यालयापर्यंत मर्यादित आहे. मात्र, महानगरपालिकेकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर येत्या १५ दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. हिंदू जागा झाला आहे. आम्ही महानगरपालिकेला पत्राद्वारे निवेदन दिले असून, त्याचे उत्तरही पत्राद्वारेच मिळावे," अशी भूमिका सकल हिंदू समाजाच्या महिला आंदोलकाने मांडली. (Kurla Mob Lynching Protest)
अनधिकृत मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत अनधिकृत मदरसे बंद करण्याची मागणी केली. "महाराष्ट्रात दिवसाढवळ्या तरुणांना मारहाण केली जाते. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या मुलांना अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस कुठून मिळते, हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्यातील अनधिकृत मदरशांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहोत," असे महिला आंदोलकाने सांगितले.
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईची मागणी
दरम्यान, या घटनेतील आरोपींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या घरांवरही बुलडोझर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांसह उद्यान परिसरातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यावरही आंदोलकांनी भर दिला. (Kurla Mob Lynching Protest)