मुंबई, (Dharavi Redevelopment Shahunagar Rehabilitation) : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत शाहूनगरमधील रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी निवास करार (पीएएए) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील ३० दिवसांत त्रिपक्षीय पुनर्वसन करार पूर्ण करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणांनी रहिवाशांना केले आहे. शाहूनगरमधील बीएमसीच्या भाडेकरूंसाठी आयोजित दोन दिवसीय जनजागृती आणि सहाय्य शिबिराचा गुरुवार, दि.१९ रोजी समारोप झाला.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी), धारावी पुनर्विकास प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (डीआरपी/एसआरए) आणि अदाणी नवभारत डेव्हलपर्स (एएनडीपीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाहूनगरमधील रहिवाशांना पुनर्वसनाचे लाभ, संक्रमण निवासाची व्यवस्था आणि पुनर्विकासाच्या वेळापत्रकाबाबत माहिती देणे हा शिबिराचा उद्देश होता.(Dharavi Redevelopment Shahunagar Rehabilitation)
शिबिराला भेट देणाऱ्या रहिवाशांशी तिन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधत पात्रता, पुनर्वसन प्रक्रिया, संक्रमण निवास आणि पुनर्विकासासंदर्भातील शंकांचे निरसन केले. पुनर्वसन प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणून डीआरपी/एसआरए, एएनडीपीएल आणि संबंधित रहिवासी यांच्यात कायमस्वरूपी पर्यायी निवास करार (पीएएए) पूर्ण करणे आवश्यक आहे.
“शाहूनगरमधील सर्व रहिवाशांनी पुढे येऊन पुढील ३० दिवसांत त्रिपक्षीय करार पूर्ण करावा, अशी विनंती आम्ही करतो. पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची आणि रहिवाशांना कायमस्वरूपी घरे वेळेत देण्याची डीआरपी आणि एएनडीपीएलची वचनबद्धता यातून दिसून येते,” असे एएनडीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले.(Dharavi Redevelopment Shahunagar Rehabilitation)
दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासकीय अधिसूचनेनुसार, धारावीतील नूतनीकरण मालमत्तांमधील पात्र रहिवाशांना किमान ५०० चौरस फुटांचे घर किंवा त्यांच्या सध्याच्या चटई क्षेत्रफळाच्या १.३५ पट क्षेत्रफळ, यापैकी जे अधिक असेल ते मिळणार आहे. सध्या २७५ ते ३७५ चौरस फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना म्हाडाच्या नव्याने बांधलेल्या इमारतींमध्ये ३५० ते ४०५ चौरस फुटांचे संक्रमण निवास उपलब्ध करून दिले जात आहे. त्याऐवजी कुटुंबांना दरमहा २२ हजार ते ३० हजार रुपये भाडे सहाय्याचा पर्यायही निवडता येणार आहे. या भाडे सहाय्यामध्ये दरवर्षी पाच टक्के वाढ करण्यात येईल. तसेच स्थलांतरासाठी १५ हजार रुपयांचा एकवेळचा भत्ताही देण्यात येणार आहे.(Dharavi Redevelopment Shahunagar Rehabilitation)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.