मुंबई (Pune MPSC Protest Rohit Pawar) : एमपीएससीच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांबद्दल आम्हाला आदर असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दोनदा नाही तर चार, पाच शिष्टमंडळासोबत चर्चा करत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. मात्र, तरीही रोहित पवार त्यांच्या आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांना हाताशी धरून पुण्यात झुंडशाही करत असल्याचे सांगत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी या कार्यकर्त्यांच्या मध्यरात्रीच्या धांगडधिंग्याचे व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केले. ही छेडछाड पुण्याच्या रस्त्यावर ३ आणि ४ ऑक्टोबरच्या रात्री झाली आणि त्याचे सगळे सीसीटीव्ही पुरावे व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगून रोहित पवार हीच तुमची नाईटलाईफ आहे का, असा सवाल त्यांनी केला.
पुण्याच्या कोरेगाव पार्कातल्या रस्त्यावर दिवसभर विद्यार्थ्यांचे नाव घेत आंदोलन करणारे आणि रात्री नाचगाणे आणि राडे करणारे हे विद्यार्थी आहेत का? हा शिवराज मोरे नेमका कुणासोबत धिंगाणा घालतोय? त्याचे भांडण नेमके कशावरून झाले? मोरेसोबत असलेला बागवान आणि बाकी सगळे कार्यकर्ते हे विद्यार्थी आहेत का? रात्री नेमकी कुणाची छेडछाड करतायत? या प्रश्नांची उत्तरे थेट रोहित पवारांनी दिली पाहिजेत, असे ते म्हणाले. (Pune MPSC Protest Rohit Pawar)
रोहित पवारांनी उत्तर द्यावे
ते पुढे म्हणाले की, "हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नाही, असे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत. हे विद्यार्थी असते तर रात्री आपल्या घरी जाऊन अभ्यास करत बसले असते. तुम्ही म्हणताय भाजप विद्यार्थ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. राडेबाजी करणारा शिवराज मोरे हा युवक काँग्रेसचा कराडचा नेता असून कराडमध्ये अनेक वर्षापासून निवडणूक लढण्याचा हा प्रयत्न करतोय. पण कराडच्या जनतेने साधे नगरसेवकपदीही त्याला किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कोणालाही निवडून दिले नाही. शिवराज मोरेची फक्त दादागिरी आणि अशा पद्धतीची झुंडशाही समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणात बागवान हा शिवराज मोरेसोबत होता. एमपीएससीच्या नावावर धांगडधिंगा घालणारे हे तुमचे कार्यकर्ते आहेत का? याचे उत्तर रोहित पवार आणि शिवराज मोरे यांनी दिले पाहिजे."
व्हिडिओ दाखवल्यानंतर ही नौटंकी कशासाठी?
"ड्रग पकडण्याचे अधिकार शिवराज मोरेकडे होते का? तीन आणि चार तारखेला हा प्रकार घडला. आज सात तारीख आहे. शिवराज मोरेने ड्रग्सबाबत नेमक्या कुठल्या पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले? कुणाकडे ड्रग असो किंवा चाकू असो, तुम्हाला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? शिवराज मोरेला कसे कळले की, त्याच्याकडे ड्रग होते? मग शिवराज मोरे ड्रग्स घेत होते का? आम्ही व्हिडिओ दाखवल्यानंतर तुम्ही ही सगळी नौटंकी आणि नवीन स्क्रिप्ट कशाला करताय?," असा सवालही नवनाथ बन यांनी केला. (Pune MPSC Protest Rohit Pawar)
रोहित पवारांचा पर्दाफाश करणार
"रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यात एकदाही एमपीएससीची परीक्षा दिलेली नाही एमपीएससीचा फॉर्म कसा भरतात, परीक्षेत काय असते हेही त्यांना माहित नाही. मग त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे दुःख काय कळणार? कितीही धमक्या द्या. आम्ही सत्य उघड केल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारांचे कार्यकर्ते रोज माझ्या फेसबुक कमेंटखाली शिव्या घालतात, धमक्या देतात. अशा धमक्यांना घाबरणाऱ्यांपैकी नवनाथ बन नाही. रोहित पवार, तुमचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. कशा पद्धतीने गुंडांना, महिलांना छेडणाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही पुण्यामध्ये एमपीएससी आंदोलन करत आहात, हे महाराष्ट्र पाहतोय. आज न्यायालयानेही सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. आता या व्हिडिओनंतर पोलीस योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करतील," असेही नवनाथ बन म्हणाले. (Pune MPSC Protest Rohit Pawar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....