लोकल रोजच उशिरा; लेटमार्क, पगारात कपात...नोकरी टिकवायची तरी कशी?

अंबरनाथ, बदलापूर, कल्याणकरांची रोजची ससेहोलपट, १५ दिवसांपासून लेटमार्कचा फटका!

    29-Oct-2026

Central Railway Local Train Delays
 
ठाणे (Central Railway Local Train Delays) : घरातून वेळेवर निघायचे, स्थानकावर पोहोचून लोकलची वाट पाहायची, गाडी उशिराने आली तरी गर्दीतून वाट काढत कार्यालय गाठायचे आणि तिथे पोहोचल्यावर बॉसच्या प्रश्नांना सामोरे जायचे. मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर, कल्याण,डोंबिवली आणि आसनगाव-कसारा पर्यतच्या नोकरदारांचा हा रोजचा दिनक्रम बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून लोकलच्या विलंबामुळे अनेकांना लेटमार्क लागत आहेत. काहींना नोटिसा मिळाल्या आहेत, तर काहींच्या पगारावर कपातीची टांगती तलवार आहे. लोकल उशिराने धावते, पण त्याची शिक्षा मात्र नोकरदारांना भोगावी लागते. रेल्वेच्या वेळापत्रकावर नियंत्रण नाही, बॉसचा विश्वास नाही आणि नोकरी गमावण्याची भीती कायम; अशा कोंडीत नोकरदार वर्ग सापडला आहे.
 
कल्याण मध्ये राहून अंधेरी पूर्वेतील सीप्झ येथे काम करणाऱ्या विनोद पाटील या तरुणाची व्यथा या परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करते. सकाळी साधारण साडेआठ वाजता सुटणारी सीएसएमटी जलद लोकल साधारण ९.३० वाजता दादरला पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत ही लोकल रोजच 20 ते 25 मिनिटे तर कधी अर्धा पाऊण तास उशिराने दादरला पोहोचते.. परिणामी, कार्यालयात उशिरा पोहोचण्याची वेळ येते. लोकलच्या विलंबाचे कारण सांगूनही बॉसचा विश्वास बसत नाही,आणि तो मेल वर मेल करून पगार कापतो. आता तर नोकरी टिकवायची असेल तर वेळेवर या अन्यथा घरीच बसा असा थेट इशाराच मला दिलाय असे विनोद म्हणाला. (Central Railway Local Train Delays)

रेल्वेचा उशीर, शिक्षा नोकरदारांना!
 
ठाणे आणि ठाणे पल्याड दररोज लाखो नोकरदार वर्ग मुंबईत नोकरीसाठी येतात. त्यांच्यासाठी लोकल उशिराने धावणे म्हणजे केवळ काही मिनिटांचा खोळंबा नाही. कार्यालयातील हजेरी, कामाचे तास, वरिष्ठांचा रोष, पगारातील कपात आणि नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यामागे आहे. वेळेवर पोहोचण्यासाठी धडपड करूनही लोकलने दगा दिला, तर त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर कशी? असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. (Central Railway Local Train Delays)
 
गेल्या पंधरा दिवसांपासून रोजच्या रोज उशीर होत असल्याने काही कर्मचाऱ्यांना लेटमार्क आणि नोटिसांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पगार कपातीचीही भीती आहे. महिन्याच्या ठरावीक पगारावर घरखर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे आणि कर्जाचे हप्ते भागवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पगारातील कपात म्हणजे थेट आर्थिक संकट. रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे कामावर परिणाम होतो, पण त्याची किंमत नोकरदारांनी आपल्या खिशातून आणि मानसिक तणावातून मोजायची का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (Central Railway Local Train Delays)

परवाच्या गोंधळाने कहर; पुढे काय?
 
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विलंबाच्या तक्रारींमध्ये परवाच्या रेल्वे गोंधळाने आणखी भर घातली.परवाच्या घटनेत तीन जणांचा बळी गेल्याने या परिस्थितीचे गांभीर्य वाढवतो. मात्र, त्या मृत्यूंनंतर तरी रेल्वे ला जाग येणार का यबाबत प्रवासी साशंकच आहेत. (Central Railway Local Train Delays)
 
मेगाब्लॉक होतात, मग वेळापत्रक का कोलमडते?
 
रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतले जातात. प्रवाशांनाही सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी देखभाल आवश्यक असल्याचे मान्य आहे. मात्र, देखभाल सुरू असतानाच नव्हे, तर दररोजच लोकल उशिराने धावत असल्याच्या तक्रारी आहेत. यबाबत प्रवाशांच्या एका गटाने दादर स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी मांडल्या आहेत. मात्र, तक्रारी मांडूनही रोजच्या प्रवासातील अनिश्चितता कायम असेल, तर सामान्य नोकरदारांनी करायचे काय? पहाटे घर सोडूनही वेळेवर कार्यालय गाठण्याची खात्री नाही, उशीर झाला तर वरिष्ठांचा अविश्वास आणि लेटमार्कमुळे पगार कपातीची भीती. अशा परिस्थितीत नोकरदार वर्गाने नोकरी टिकवायची कशी आणि घराची जबाबदारी सांभाळायची कशी आशा मनस्थितीत हालअपेष्टा सहन करीतच दररोजचा प्रवास करत असतो. (Central Railway Local Train Delays)
 
 




संबंधित मजकूर