मुंबई, दि. २७ : प्रतिनिधी
लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार देशातील सर्व विधिमंडळांसाठी 'कार्यपद्धती व कामकाज संचालनाचे एकसमान आदर्श नियम' तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज, मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे या समितीचे सदस्य असून, या बैठकीत ते राज्याची भूमिका मांडणार आहेत.
दिल्ली विधानसभेच्या यजमानपदाखाली ही बैठक पार पडणार आहे. देशभरातील सर्व राज्य विधिमंडळांच्या कामकाजात सुसूत्रता आणि समानता आणण्याच्या दृष्टीने या समितीचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
म्हैसूरच्या बैठकीत मसुद्याचे निर्देश
यापूर्वी या पाच सदस्यीय समितीची बैठक दि. १२ मे २०२६ रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे पार पडली होती. त्या बैठकीत विस्तृत चर्चा झाल्यानंतर एकसमान नियमावलीच्या अहवालाचा मसुदा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. समितीच्या निर्देशानुसार, उत्तर प्रदेश विधानसभा सचिवालयाचे प्रधान सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी या नियमावलीचा मसुदा अहवाल तयार केला आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे हा मसुदा महाराष्ट्र, नागालँड, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या पाच राज्यांच्या विधानसभा सचिवालयांच्या सचिवांकडे पाठवण्यात आला होता.
आता दिल्लीत होणाऱ्या बैठकीत हाच मसुदा अहवाल समितीसमोर अंतिम स्वीकृतीसाठी मांडला जाईल. या मसुद्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देशातील संसदीय कामकाजाच्या इतिहासात एकसमान कार्यपद्धतीचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे राजकीय व संसदीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.