मुंबई(Karjat Tree Felling Controversy): "रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवरच्या ‘जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पा’साठी होणार्या वृक्षतोडीवरून राजकीय वाद तापला आहे. याप्रकरणी विरोधक ‘फेक नरेटिव्ह’ पसरवत आहेत,” असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, तर "भीमाशंकर मंदिर परिसरातील कथित वृक्षतोड आणि प्रकल्पाशी ‘अदानी समूहा’चा संबंध नाही,” असे स्पष्टीकरण कंपनीने केले आहे. (Karjat Tree Felling Controversy)
कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात प्रस्तावित तीन हजार मेगावॅट क्षमतेच्या पंप साठवण प्रकल्पाबाबत बोलताना फडणवीस यांनी "हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी महत्त्वाचा आहे,” असे सांगितले. "प्रकल्पासाठी वापरल्या जाणार्या जमिनीच्या बदल्यात वनविभागाला तिप्पट जमीन देण्यात आली आणि त्या जमिनीवर वनविभागाकडून ९० हजार झाडे लावली जाणार आहेत,” असे त्यांनी नमूद केले. "भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून हा प्रकल्प १६ किमी, तर भीमाशंकर मंदिरापासून २० किमी अंतरावर आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. "आवश्यक कायदेशीर मंजुरी आणि १८ महिन्यांच्या सुनावण्यांनंतर प्रकल्पाला मान्यता मिळाली,” असे सांगताना "स्थानिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर मार्ग काढला जाईल आणि कोणाच्याही उपजीविकेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. (Karjat Tree Felling Controversy)
खोटे, दिशाभूल करणारे व्हिडिओ:‘अदानी समूहा’चे स्पष्टीकरण
भीमाशंकर मंदिराजवळ वृक्षतोड आणि स्थानिकांचे विस्थापन होत असल्याचे दर्शवणार्या काही चित्रफितींमध्ये ‘अदानी समूहा’चे नाव जोडले जात होते. यावर समूहाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, "या चित्रफिती खोट्या, दिशाभूल करणार्या आणि बनावट आहेत. संबंधित परिसरात समूहाचा कोणताही सुरू असलेला किंवा प्रस्तावित प्रकल्प नाही. तसेच, चित्रफितींमध्ये दाखवलेल्या कामांशी समूहाचा कोणताही संबंध नाही,” असे निवेदनात म्हटले आहे. समूहाने नागरिकांना माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे आणि अप्रमाणित माहिती प्रसारित करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. (Karjat Tree Felling Controversy)
‘एआय’च्या मदतीने पंतप्रधानांचा उल्लेख
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका कथित पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आहे. मात्र, हा पूर्ण आशय ‘एआय’द्वारे निर्मिती करून तो मूळ पत्रात टाकल्याचे उघड झाले आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मूळ पत्रात पंतप्रधानांच्या उद्घाटन दौर्याचा उल्लेख हा ‘एआय’च्या मदतीने करून ते पत्र व्हायरल करण्यात आले आहे. (Karjat Tree Felling Controversy)