ठाणे (India Jewellery Park Mahape) : नवी मुंबईतील महापे येथे उभारण्यात येणाऱ्या इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्रच्या दागिने उद्योगाला आणी जागतिक बाजारपेठेत निर्यातीला नवी संधी मिळणार असून या प्रकल्पातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात २२ एकरांवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती होती..दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पामुळे दागिने उत्पादन, व्यापार आणि निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईला झवेरी बाजार, भारत डायमंड बोर्स आणि सीप्झमुळे रत्न व आभूषण व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आता या पारंपरिक व्यापाराला आधुनिक उत्पादन सुविधांची जोड देण्याचा प्रयत्न इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून केला जाणार आहे. कुशल कारागीर, अनुभवी उद्योजक आणि व्यापाराचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची बलस्थाने असून, त्यांचा उपयोग जागतिक बाजारपेठेत राज्याचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. मात्र, प्रकल्पातून अपेक्षित गुंतवणूक आणि रोजगार प्रत्यक्षात किती वेगाने साकार होतात, यावर त्याचे यश अवलंबून राहणार आहे. (India Jewellery Park Mahape)
जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राला मोठी संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यामुळे राज्याला जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील बदलांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात नवी आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे उद्योगांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (India Jewellery Park Mahape)
उद्योगांच्या उभारणीसाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, वीज, पाणी, रस्ते, भांडवल आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक आहे. इंडिया ज्वेलरी पार्कच्या कामात अडचणी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने सहकार्य करावे, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या उद्दिष्टात उत्पादन, निर्यात आणि रोजगारनिर्मिती महत्त्वाची असून, महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयालाही अशा प्रकल्पांमधून बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
ज्वेलरी उद्योगात २५ हजार कोटींची गुंतवणूक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इंडिया ज्वेलरी पार्कमधून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महापे येथे २२ एकरांवर उभारण्यात येणाऱ्या या केंद्रात दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईच्या झवेरी बाजाराला रत्न व आभूषण व्यापाराचा मोठा इतिहास असून, भारत डायमंड बोर्स आणि सीप्झसारख्या केंद्रांमुळे मुंबईने जागतिक हिरे व्यापार व दागिने निर्यात क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.(India Jewellery Park Mahape)
देशाच्या एकूण रत्न व आभूषण निर्यातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक निर्यात महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबईतून होते, असे शिंदे यांनी नमूद केले. राज्याच्या जेम्स अँड ज्वेलरी धोरणांतर्गत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि रत्न व आभूषण निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत कामगारांच्या निवासाची व्यवस्थाही विचारात घेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या कामात अडथळे आल्यास शासनाकडून आवश्यक सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (India Jewellery Park Mahape)
ज्वेलरी पार्कमुळे नवी मुंबईचे महत्त्व वाढणार : वनमंत्री गणेश नाईक
नवी मुंबईची ओळख भविष्यात डेटा सेंटर हब म्हणून विकसित होत असताना इंडिया ज्वेलरी पार्कमुळे शहराचे जागतिक स्तरावरील महत्त्व आणखी वाढेल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. औद्योगिकीकरणातून निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेच्या लाटांसारखी आव्हाने असतानाही शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना शाश्वत जीवनासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे नाईक यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे,उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी आणि उपाध्यक्ष शौनक पारिख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी किरीट भन्साळी यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि उद्योगाच्या विकासातील त्याचे महत्त्व विशद केले. (India Jewellery Park Mahape)