डोंबिवली : (Dombivli MIDC Road Construction)"डोंबिवली एमआयडीसी परिसरात नियोजनशून्य कारभाराचा कळस पाहायला मिळत असून, कोट्यवधी रुपये खर्च करून नुकतेच तयार केलेले नवीन काँक्रिट रस्ते पुन्हा एकदा तोडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळा संपताच सुरू झालेल्या या 'तोडफोड' सत्रामुळे जनतेच्या पैशांचा अक्षरशः चुराडा होत असून, मिलापनगरमधील एका नाल्याच्या बांधकामासाठी मुख्य रस्ताच खोदण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे."
मिलापनगर मधील रस्ता क्रमांक दोन वरील बंगलो भुखंड क्रमांक आरएल 127 समोर एका मोठ्या नाल्याच्या बांधकामासाठी काँक्रीटचा रस्ता तोडला गेला असून तेथील वाहतूक बंद केली. पादचाऱ्यांना पण तेथून जाता येत नसल्याने मोठा वळसा घालून जावे लागत आहे. अंदाजे महिनाभर त्रास हा वाहन धारक आणि पादचाऱ्यांना होणार आहे. शिवाय हा रस्ता तोडताना आवाज आणि धूलिकण याचे प्रदूषण होत आहे. जवळच बंगल्यात राहणारे एक वयोवृध्द जोडपे (94 व 90वर्षे) यांना व इतरांना या प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.(Dombivli MIDC Road Construction)
एमआयडीसी मधील असे अनेक रस्ते हे नवीन नाले, गटारे, सांडपाणी, विद्युत, पाणी वाहिन्या अशा विविध कारणासाठी यापूर्वी तोडण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत असे अंदाजे 21 रस्ते तोडण्यात आल्यामुळे जनतेच्या पैशाचा चुराडा झाला असून या नियोजनशून्य कामाला प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी केला आहे.(Dombivli MIDC Road Construction)