मुंबई (Ashish Shelar on Jarange Audio Clip): मनोज जरांगे यांनी दाखवलेल्या ऑडिओ क्लिपशी भाजपचा काहीही संबंध नसून या क्लिपची सत्यता पडताळणे महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, "मुळत बाजारात अशा ऑडिओ क्लिप खूप फिरत असतात. या सगळ्या ऑडिओ क्लिपमधील सत्यता तपासणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. एखाद्या ऑडिओ क्लिपला पूरक गोष्टी नसतात तोपर्यंत अशा कुठल्याही तंत्रज्ञानाच्या आधारित गोष्टीला पुरावा मानलाच जात नाही. या क्लिपमधील कुठलाही आवाज हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा नाही. ही ऑडिओ क्लिप कथित ऑडिओ क्लिप आहे. ज्यांनी ऑडिओ क्लिप दाखवली त्यांनी याची सत्यता तपासली असती तर बरे झाले असते. मुख्यमंत्र्यांनी या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करावी, अशी आम्ही विनंती करतो. ही कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशी आली? त्याची सत्यता आहे? त्यात तंत्रज्ञानाचा वापर झाला का? मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ती कोणी पोहोचवली? त्यांनी आता ती का बाजारात आणली? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे." (Ashish Shelar on Jarange Audio Clip)
उदय सामंतांचा गैरसमज दूर करू
शिवसेना नेत्यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, "या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे हेही आम्हाला मान्य नाही. या ऑडिओ क्लिपधील तथाकथित चर्चांना आमची असहमती आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. उदय सामंत यांचा गैरसमज झाला असेल. त्यांनी समज करून घेतला असता तर त्यांनी विधान केले नसते. ज्या ऑडिओ क्लिपला पूरक कुठलाही पुरावा नाही त्यावर खळबळ माज माजू शकते पण सत्यता बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे उदय सामंत यांचा सुद्धा गैरसमज आम्ही दूर करू. यामध्ये भाजपच्या कुठलाही नेत्याचा आवाज नाही. मुळात ही ऑडिओ क्लिपच सत्य आहे की, नाही हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आम्हाला मान्य नाही. ते महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे कुणीही त्यांच्यावर शंका उपस्थित करत असल्यास ते आम्हाला मान्य नाही. शिवसेनेच्या नेत्यांचा गैरसमज असेल तो दूर केला जाईल. त्यांना आपापसात चर्चा करायला काहीच अडचण नाही. पण सार्वजनिक बोलताना सत्यता बघितली पाहिजे. या सगळ्याचे मूळ सखोल चौकशीमध्ये आहे. आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी पूर्ण सत्यता पडताळून मांडणी केली असती तर बरे झाले असते. भारतीय जनता पक्षाचा दामन साफ आहे. या सगळ्या चर्चेशी कथित क्लिपशी आणि त्यातील नावांशी आम्ही असहमत आहे." (Ashish Shelar on Jarange Audio Clip)
राज ठाकरेंकडून बदनामीचा कट
राज ठाकरे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर बोलताना मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, "रोज सिनेमा पाहणाऱ्यांना सिनेमाचे क्लायमॅक्स आणि सीन दिसतात ते कल्पोकल्पित असतात. त्याचा सत्याशी काही संबंध नाही. देशात २०१४ पासून झालेल्या निवडणुकीत लोकांनी भाजप-एनडीएला निवडून दिले आहे. त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे यातून आपण एक कथानक बनवू शकतो. सिनेमाचा क्लायमॅक्स बनवू शकतो पण त्याला सत्यतेचा आधार असू शकत नाही. त्यामुळे ऑडिओ क्लिप ते डॉक्युमेंटरी, सिनेमा यांना सत्याचा काही आधार नाही. यात सत्यता असेल तर डॉक्युमेंट्री वाल्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. हा बदनामीचा कट आहे. अशा बदनामीला आम्ही सहन करणार नाही. राज ठाकरेंनी हे उद्योग बंद करावेत. सत्य असेल तर जनतेसमोर मांडावे. या पद्धतीने बदनामीचे कटकारस्थान सुरु झाले तर, भाजपकडे काय काय गोष्टी असू शकतील याची कल्पना त्यांनी घ्यावी. रिजीम चेंजच्या विषयात परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी काल बोलले. त्यामुळे विरोधकांना दिवसाढवळ्या स्वप्न पडतात आणि स्वप्नातून काहीही सत्य येणार नाही." (Ashish Shelar on Jarange Audio Clip)