बांदल चाळीतील पात्र ५९ कुटुंबांना; `पीएपी'च्या माध्यमातून घरे मिळणार

खासदार नरेश म्हस्केंसह नगरसेवक संजय वाघुलेंच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक

    22-Oct-2026

Bandal Chawl PAP Homes
 
ठाणे : (Bandal Chawl PAP Homes)ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन ठाणे स्टेशनच्या कामात बाधित होणार्‍या नौपाड्यातील बांदल चाळीतील पात्र ५९ कुटुंबांना `एसआरए'कडून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या `पीएपी' कोट्यातील घरे मिळणार आहेत. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या पुढाकारातून महापालिकेत झालेल्या बैठकीत रहिवाशांनी रेंटल घरांऐवजी `पीएपी'च्या माध्यमातून घरे देण्याचा आग्रह धरला. रहिवाशांची मागणी मान्य करून खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
नवीन रेल्वे स्टेशन प्रकल्पामध्ये रेल्वेबरोबरच ठाणे महापालिका सहभागी झाली आहे. महापालिकेने नव्या स्थानकासाठी जोड रस्ते व पायाभूत सुविधांची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे या कुटुंबांचे महापालिकेने घर देऊन पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी सुरुवातीपासूनच संजय वाघुले यांच्याकडून केली जात होती. तीन दिवसांपूर्वी पूर्ण झालेल्या बांदल चाळीच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणात ५९ कुटुंबे पात्र ठरली होती. त्यानंतर या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांच्यासह संजय वाघुले यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती. या बैठकीत महापालिकेकडून घर देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली होती.(Bandal Chawl PAP Homes)
 
महापालिकेकडून धोकादायक इमारतीतील रहिवाशांना रेंटल पद्धतीने घरे दिली जातात. तर प्रकल्पात बाधित नागरिकांना `पीएपी' तत्त्वानुसार घरे उपलब्ध केली जातात. महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के व ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी रहिवाशांची भूमिका जाणून घेतली. त्यांना घरांसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. त्यावेळी सर्व रहिवाशांनी `पीएपी' तत्त्वानुसार घरांची मागणी केली. तसेच याबाबत आवश्यक शुल्क भरण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार महापालिककेडून ५९ कुटुंबांना मोफत घरे देण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.
 
या वेळी शिवसेनेचे गटनेते पवन कदम, स्थावर मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त राजेश सोनावणे, नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेशकुमार जामनोर, उपनगर अभियंता देवेंद्र नेर, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे आदींसह बांदल चाळीतील काही रहिवाशी उपस्थित होते. या निर्णयाबद्दल बांदल चाळीतील रहिवाशांनी खासदार नरेश म्हस्के व नगरसेवक संजय वाघुले यांचे आभार मानले आहेत.(Bandal Chawl PAP Homes)
 




संबंधित मजकूर