स्वातंत्र्यसेनानी चित्रकार सरलादेवी मजुमदार जहांगीरमध्ये : ‘कलासरला’चे प्रदर्शन

    15-Sep-2023
Total Views |
Exhibition of 'Kalasarla'


गांधीविचारांनी प्रेरित झालेल्या स्व. सरला मजुमदार यांनी महात्मा गांधी यांच्याप्रती त्यांच्या असलेल्या भावना, जलरंगांच्या लेपनातून साकारलेल्या, ‘मोहन ते महात्मा’ या प्रदीर्घ गांधी प्रवासातील प्रसंग दृश्यांद्वारे व्यक्त केल्या आहेत. या चित्रांद्वारे त्यांची रंगसाधना आणि गांधी उपासना यांचा सुरेख संगम मुंबईतील जहांगीर कलादालनात दि. १२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत समस्त कलारसिकांना अनुभवता येणार आहे. अशा या ऐतिहासिक कलाकृतींच्या प्रदर्शनाविषयी...

मुंबईतील जहांगीर कलादालनात या सप्ताहात एक ऐतिहासिक घटना घडत आहे. दि. १२ ते १८ सप्टेंबर हा सप्ताह समस्त कलाकार आणि कलारसिकांसाठी सुवर्णमहोत्सवी किंवा अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असलेल्या ऐतिहासिक कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या कलाकृती पाहताना, सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या पारदर्शक जलरंगातील रंगविल्या कलाकृती बघण्याचा, अनुभव घेण्याचा आनंद होतो. ‘गॉश’ पद्धतीने रंगकाम केलेली कलाकृती कशी दिसेल? तसा परिणाम या कलाकृती पाहताना दिसतो. मात्र, या कलाकृती नियमित, जलरंग लेपनाद्वारेच चितारलेल्या आहेत. ’कलासरला’ मालिकांद्वारे भारतात विविध ठिकाणी प्रदर्शने आयोजित करणार्‍या ’कला सरला परिवारा’तर्फे जहांगीर कलादालनात हे प्रदर्शन सुरू आहे. सुमारे १०० हून अधिक कलाकृती येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.१९११ साठी जन्मलेल्या चित्रकार सरलादेवी मजुमदार या ’स्वातंत्र्यसेनानी म्हणून अधिक परिचित राहिलेल्या समकालीन चित्रकार होय. भारतीय संस्कृती, भारतीय सामाजिक परिस्थिती आणि भारतीय ऐतिहासिक व्यक्तिमत्वे या व अशा ’गांभीर्य निर्माण करणार्‍या विषयांवर त्यांच्या चित्रशृंखला आहेत.

सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनात विविध गटात विभागणी करून कलाकृती प्रदर्शित केलेल्या आहेत. ’जगभरातील प्रतिभावंत स्त्रिया’ या शीर्षकाखाली सरलादेवींनी समकालीन महिला व्यक्तिमत्वे चितारलेली आहेत. रंगलेपनातील त्यांची स्वतःची शैली या व्यक्तिचित्रणाद्वारे ध्यानात येते. त्यांची दुसरी एक गाजलेली मालिका म्हणजे, ’मोहन ते महात्मा ...’! यात त्या काळातील महात्मा गांधी या व्यक्तिमत्त्वाची सार्‍या जगावर एक छाप होती. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सरला मजुमदार यांनी महात्मा गांधी यांच्याप्रती त्यांच्या असलेल्या भावना, जलरंगांच्या लेपनातून साकारलेल्या, ’मोहन ते महात्मा’ या प्रदीर्घ गांधी प्रवासातील प्रसंग दृश्यांद्वारे व्यक्त केलेल्या आहेत. या चित्रांद्वारे त्यांची रंगसाधना आणि गांधी उपासना यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. या प्रदर्शनात तिसरा एक विभाग पाहायला मिळतो. रामायण, महाभारत, शिवमहिम्न स्तोत्रे यांच्या आधारावरील भगवान श्रीकृष्ण शिव, प्रभू श्रीराम या धार्मिक देवतांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काही धार्मिक प्रसंग चित्रणे साकारलेली आहेत. याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या, नैसर्गिक अभिव्यक्तींपासून स्वातंत्र्य-सबलीकरण असा विशिष्ट संदेश देणारी आणखी काही मनोरंजक चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतात.

हिंदू दिनदर्शिकेनुसार नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ’सरलादेवी’ या कलादुर्गेचा जन्म १९११ साली झाला. जीवनातील उच्च मूल्ये जपण्याचा वसा उचललेल्या तीर्थरूप वडिलांचा समृद्ध वारसा सरलादेवींना लाभला होता. कारण त्यांचे वडील हे न्यायाधीश’ होते. वडिलांकडून उच्च सामाजिक मूल्य आणि मातोश्रींकडून उदारमतवादी विचारसरणीच्या पुरोगामी विचारांचा वारसा त्यांना मिळाला. दोन भिन्न तथापि त्यांच्या त्यांच्या जागी आदर्श असलेल्या संस्कार शाखांनी सरलादेवींच्या बालमनावरच कलाप्रज्ञेच्या रुपाने रंगसंगम झालेला होता. अवघ्या १३व्या वर्षी रेखाटलेल्या रांगोळीला पुरस्कार मिळविणार्‍या सरलादेवी यांनी स्वतःच्याच कल्पनेतून विविध समकालीन विषयावर स्केचेस आणि चित्रांकने रेखाटून मराठी आणि गुजराती नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केली. त्यांच्या स्वशिक्षित चित्रसाधनेला पुढे अधिकृत शिक्षणाची जोड लाभली. कारण, योग्य वयात त्यांचे सर जे. जे स्कूलमध्ये कला शिक्षण पूर्ण झाले. (१९३७) त्या काळातील एकूणच सामाजिक आणि राजकीय परिस्थिती फारच भिन्न होती, आजच्या तुलनेत...!! युद्धजन्य वातावरणाने त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आणि कला जोपासण्याच्या साधनेवर एकत्रित परिणाम झाला. जागतिक स्तरावर महात्मा गांधी यांच्या विचारांनी अद्भुत किमया केली होती. त्या गांधी विचारांनी सरलादेवी प्रभावित झाल्या.

१९४३च्या दरम्यान म. गांधी, पुण्याच्या आगाखान पॅलेस येथे आंदोलकाच्या भूमिकेत होते. त्यांना जवळून पाहण्याचा योग सरलादेवींना आला. गांधी विचारांनी त्यांच्या कलाजीवनावरही प्रभाव टाकला. त्यांनी जणू गांधीमय होऊन जी ’गांधी-चित्रश्रृंखला’ साकारली, त्यावर त्यांनी एक पुस्तक हिंदी भाषेत प्रकाशित केले. २५ प्रसंगांवर आधारित कथा असलेले हे पुस्तक बालमनावर प्रभाव पाडेल, अशा सुलभ, भाषेत लिहिलेले आहे. ’क्रिएटीव्ह’ आणि ’व्हिज्युअल’ एकाच वेळी एकाच व्यक्तीने निर्माण करण्याची किमया म्हणजे हे पुस्तक होय. पुढे १९ भारतीय भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवादही झालेला आहे.त्यांच्या प्रदर्शित झालेल्या या कलाकृतीचं योग्य ठिकाणी जतन व्हावं, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. अशा या दिवंगत कलावतीस विनम आदरांजली. हे प्रदर्शन सर्वांनी पाहावे असे वाटते.- प्रा. डॉ. गजानन शेपाळ


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.