तणमोराचा ‘ग्रासलॅण्ड एक्सप्रेस’

    07-Sep-2026   
 
Lesser Florican
 
एका नर तणमोराच्या पाठीवर लावलेल्या उपग्रह ट्रान्समीटरने महाराष्ट्रातील गवताळ अधिवासांचे एक वेगळेच नकाशे उलगडले. सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी थांबे घेत, ’LFM9’ या तणमोराने केलेला प्रवास त्याच्या संवर्धनासाठी अधिवासांची सलगता किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करतो. त्याच्या या प्रवासाचा घेतलेला हा आढावा...
 
महाराष्ट्राच्या माळरानांवर, कुरणांमध्ये आणि गवताळ प्रदेशांत आढळणारा तणमोर हा भारतातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि संकटग्रस्त पक्षी आहे. इंग्रजीत त्याला 'Lesser Florican' म्हणतात, तर शास्त्रीय नाव 'Sypheotides indicus' असे आहे. ‘जगातील सर्वांत लहान बस्टर्ड पक्षी’ म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी आकाराने लहान असला, तरी त्याचे जीवनचक्र आणि स्थलांतराचा प्रवास अत्यंत व्यापक आहे. पावसाळा, गवताची वाढ, प्रजननासाठी योग्य अधिवास आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार त्याच्या हालचाली बदलत असतात. त्यामुळे तणमोराचा अभ्यास म्हणजे केवळ एका पक्ष्याचा अभ्यास नसून, भारतातील गवताळ परिसंस्थेच्या आरोग्याचा अभ्यास आहे. तणमोराचे भारतातील प्रजनन अधिवास महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही मोजक्या गवताळ पट्ट्यांपुरते मर्यादित राहिले आहेत. पूर्वी त्याचा विस्तार अधिक मोठा होता. महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही त्याच्या प्रजनन क्षेत्रांची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या काही दशकांत गवताळ प्रदेशांचे शेतीत रूपांतर, अधिवासाचे तुकडीकरण, वाढता चराईचा दबाव आणि मानवी व्यत्यय यामुळे या पक्ष्याची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. देशव्यापी सर्वेक्षणानुसार, १९९९ मध्ये तणमोरांची संख्या सुमारे ३ हजार ५३० होती. त्याच्या तुलनेत अलीकडील सर्वेक्षणात ही संख्या सुमारे ४८० पक्ष्यांपर्यंत घटल्याचे नमूद आहे. ही घट सुमारे ८० टक्के आहे.
 
टॅगिंगमुळे उलगडलेले रहस्य
 
तणमोराच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी गुजरात वनविभागाच्या सहकार्याने ‘दि कॉर्बेट फाऊंडेशन’च्या संशोधकांनी २०२० ते २०२२ या काळात १२ पक्ष्यांना उपग्रहआधारित ट्रान्समीटर लावले. या पक्ष्यांमध्ये ११ नर आणि एक मादी होती. त्यांचे निरीक्षण २०२५ पर्यंत करण्यात आले. एकाच टॅगिंग प्रयत्नातून अभ्यासलेला तणमोरांचा हा भारतातील सर्वांत मोठा अभ्यास आहे. या अभ्यासातून एकूण १ लाख ६० हजार १६६ ‘जीपीएस’ स्थान नोंदी मिळाल्या. त्यावरून पक्षी कोणत्या अधिवासात किती वेळ राहतात, कोणत्या ऋतूत किती अंतर कापतात आणि दिवस-रात्र त्यांच्या हालचालींमध्ये काय फरक असतो, याचा अभ्यास करण्यात आला.
 
स्थलांतराचे अनेक थांबे
 
या उपग्रहआधारित अभ्यासातून तणमोराच्या स्थलांतराचा एक महत्त्वाचा पैलू समोर आला आहे. तणमोराचा प्रवास एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी होणारी सरळ किंवा एकदाच पूर्ण होणारी हालचाल नसून, त्यात अनेक थांबे असतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदवलेल्या हालचालींमधून हे स्पष्ट होते. अभ्यासानुसार तणमोराचा एकूण स्थलांतर मार्ग सुमारे २ लाख ६ हजार चौ. किमी क्षेत्रात पसरलेला आहे. त्यातील सुमारे ६० हजार चौ. किमी क्षेत्रात स्थलांतराची घनता अधिक असल्याचे आढळले. या उच्च घनतेच्या मार्गाची सरासरी रुंदी सुमारे ७०.८ किमी असल्याचे संशोधनात नमूद आहे. याचा अर्थ तणमोराच्या संवर्धनासाठी फक्त त्याचे प्रजनन क्षेत्र वाचवणे पुरेसे नाही; त्याच्या स्थलांतर मार्गातील गवताळ पट्टे, शेतीचे भाग आणि विश्रांतीची ठिकाणे यांचेही संरक्षण करणे आवश्यक आहे. हे मार्ग तुटले, तर पक्ष्यांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो.
 
LFM9 या नर तणमोराचा प्रवास

या तणमोराने डिसेंबर २०२२ मध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील विरोबानगर, पांगरी आणि वावरहिरे येथे पाच दिवसांचा थांबा घेतला. त्यानंतर म्हसवड आणि वरकुटे मलवडी येथे प्रत्येकी एक दिवस नोंदला गेला.

यानंतर त्याचा प्रवास सांगली जिल्ह्यातील आटपाडी परिसराकडे वळला. आटपाडी, बनपुरी आणि निंबवडे येथे डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान ८९ दिवसांचा मुक्काम नोंदवला आहे. त्यानंतर माळेवाडी आणि कारगणी येथे मार्च ते एप्रिल २०२३ दरम्यान आणखी ३३ दिवसांचा थांबा दिसून येतो.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. गौडवाडी, करांडेवाडी, बुद्धेहाळ, हतीद आणि अजनाळे या गावांच्या परिसरात मार्च ते जून २०२३ दरम्यान ७७ दिवसांचा मुक्काम नोंदवण्यात आला. त्यानंतर उजनी, माढा येथे दोन दिवसांचा थांबा, तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परांडा तालुक्यांतील वालवड, पाटसंगवी आणि कुक्कडगाव येथे जून ते जुलै २०२३ दरम्यान आठ दिवसांची नोंद आहे.

महाराष्ट्रातील या प्रवासाचा पुढील टप्पा मराठवाडा आणि विदर्भाकडे जातो. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे जुलै २०२३ मध्ये एक दिवसाची नोंद आहे. त्यानंतर जालना आणि बुलढाणा जिल्ह्यांतील जालना, सिंदखेड राजा, मेहकर आणि शेगाव या भागांत पक्ष्याने थांबे घेतले. बुलढाणा जिल्ह्यातील कळंबेश्वर आणि शेगाव परिसरातील चिंचोली करफर्मा, कानारखेड येथे प्रत्येकी दोन दिवसांची नोंद आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि बेलखेड येथे सात दिवसांचा थांबा, तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सायखेड येथे एक दिवसाची नोंद आहे. या नोंदींमधून तणमोरांचा प्रवास केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, मराठवाडा आणि विदर्भातील मोकळ्या अधिवासांपर्यंत पोहोचतो, हे दिसून येते.

LFM9 ने नोव्हेंबर २०२३मध्ये गुजरात आणि मध्य प्रदेशातून परतताना महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये थांबे घेतले. नंदुरबारमधील शहादा, धुळ्यातील साक्री, अहिल्यानगरमधील पारनेर, पुण्यातील बारामती, सातार्‍यातील फलटण आणि माण, तसेच सांगली-सोलापूर सीमेवरील आटपाडी-सांगोला परिसर या नोंदींमध्ये आढळतात.

विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डिसेंबर २०२३ ते मे २०२४ दरम्यान १७५ दिवसांचा मुक्काम नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर सांगोला तालुक्यातील झापाचीवाडी, उडाणवाडी आणि पाचेगाव खुर्द येथे मे ते जून २०२४ दरम्यान ११ दिवसांचा थांबा दिसतो. या नोंदी महाराष्ट्रातील काही गवताळ प्रदेश तणमोरांच्या प्रवासात दीर्घ काळ वापरले जात असल्याचे दर्शवतात.
ऋतुंनुसार हालचाली
 
तणमोराच्या हालचालींमध्ये ऋतूनुसार मोठा फरक आढळतो. अभ्यासात पावसाळ्यात आणि दिवसा त्याच्या हालचाली इतर ऋतू आणि रात्रीच्या तुलनेत अधिक लांब व वेगवान असल्याचे आढळले. या हालचालींचा संबंध प्रजननासाठी योग्य क्षेत्र शोधणे, प्रजनन क्षेत्रात पोहोचणे आणि अनुकूल परिस्थितीचा फायदा घेणे यांच्याशी असू शकतो. मात्र, या हालचालींच्या नेमक्या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी अभ्यासात ऋतू आणि दिवस-रात्र या दोन्ही घटकांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. अभ्यासात तणमोराच्या रात्रीच्या अधिवास वापरावर कृत्रिम प्रकाशाचा परिणामही तपासण्यात आला. निवासी पक्ष्यांमध्ये रात्रीच्या प्रकाशाचा नकारात्मक परिणाम स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांपेक्षा अधिक ठळक असल्याचे आढळले. यावरून तणमोराच्या संवर्धनात केवळ जमीन आणि गवत यांचाच विचार न करता, मानवी हस्तक्षेपाच्या इतर स्वरूपांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे दिसते. रात्रीच्या प्रकाशाचे प्रमाण, मानवी हालचाली आणि इतर पायाभूत सुविधांचा विस्तार यांचा अधिवासावर होणारा परिणाम अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.
 
सहा राज्यांत वावर
 
गुजरात वनविभाग आणि ‘दि कॉर्बेट फाऊंडेशन’च्या अभ्यासातून लॅसर फ्लोरिकनच्या स्थलांतर मार्गांतील गवताळ व कृषी अधिवासांचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि तेलंगण या सहा राज्यांत त्याचा वावर आढळला. वीजवाहिन्यांमुळे त्यांना धोका असल्याने अधिवासांचे संरक्षण व पुनर्स्थापना गरजेची आहे. तसेच कृषी-पशुपालक समुदायांचा सहभाग आणि सहकार्य संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. - केदार गोरे, संचालक, कॉर्बेट फाऊंडेशन




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर