छत्रपती संभाजीनगर, (Chhatrapati Sambhajinagar Conversion Case): कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून हिंदू शिक्षक पती-पत्नीचे ख्रिश्चन धर्मांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आला आहे. वैजापूर तालुक्यातील वीरगावमध्ये घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फादर आशिष म्हस्के आणि फादर जेरॉल्ड रिबेलो यांच्यासह सुदाम उबाळे, संजय रूपेकर आणि विनोद शेळके अशा पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Chhatrapati Sambhajinagar Conversion Case)
वैजापूर तालुक्यात बोरसर येथील शांती सदन प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणार्या बाळासाहेब साठे आणि त्यांच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, साठे पती-पत्नीला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची अट घालण्यात आली. नोकरीच्या आशेने दाम्पत्याने धर्मांतर केले. माळी घोगरगाव येथील चर्चमध्ये दाम्पत्याचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतरही कायमस्वरूपी नियुक्ती न देता, सुमारे दोन वर्षे त्यांच्याकडून काम करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धर्मांतरानंतरही नोकरीत कायम करण्यासाठी या दोघांकडून तब्बल पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अडचणीत असलेल्या साठे दाम्पत्याने व्याजाने पैसे उचलून ही रक्कम संस्थेतील एका व्यक्तीला दिली. मात्र, पैसे दिल्यानंतरही नोकरी कायम झाली नाही. उलट, तुमच्या मुलांचेही धर्मांतर करावे लागेल, अशी अट घालण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मुलांचे धर्मांतर करण्यास साठे कुटुंबाने नकार दिल्यानंतर कथित दबाव वाढल्याचेही तक्रारीत नमूद आहे.(Chhatrapati Sambhajinagar Conversion Case)
धर्मांतरासाठी नोकरीचा सौदा?
रोजगाराची गरज असलेल्यांना हेरून धर्म बदलण्याची अट घालायची, त्यानंतर आर्थिक मागणी आणि शेवटी मुलांनाही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकायचा असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सततच्या अटी आणि कथित दबावामुळे तक्रारदार मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी घर सोडल्याचेही पोलीस तक्रारीत नमूद आहे. नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.(Chhatrapati Sambhajinagar Conversion Case)