‘जिथे प्रवासी, तिथे एसटी’; फेऱ्यांच्या नव्या नियोजनाचा थेट परिणाम ऑगस्टमध्ये उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

 
MSRTC Revenue Increase
 
मुंबई (MSRTC Revenue Increase) : प्रवाशांची मागणी ओळखून बसफेऱ्यांचे नियोजन करण्याच्या एसटी महामंडळाच्या नव्या धोरणाचा थेट परिणाम उत्पन्नावर दिसून आला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली असून, प्रथमच मासिक उत्पन्नाने एक हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाने दिली आहे. ऑगस्टमध्ये प्रथमच एसटीचे मासिक उत्पन्न एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. उत्पन्नवाढीचा हा कल कायम राहिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून काढण्याची शक्यता महामंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
 
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी उत्पन्नवाढीसाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण आढावा बैठका आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनंतर आगारनिहाय वाहतूक नियोजनात बदल करण्यात आले. ‘जिथे प्रवासी, तिथे एसटीची फेरी’ या भूमिकेतून प्रवाशांची प्रत्यक्ष मागणी असलेल्या मार्गांवर फेऱ्या वाढविण्यात आल्या, तर तुलनेने कमी प्रवासी असलेल्या अनुत्पादक फेऱ्यांचा फेरआढावा घेण्यात आला. (MSRTC Revenue Increase)
 
एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटरच्या आतील अंतराचा प्रवास करतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या फेऱ्यांपेक्षा ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्थानिक प्रवाशांच्या गरजांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाच्या वेळांचा अभ्यास करून वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात आले. याशिवाय आठवडी बाजार, यात्रा-जत्रा आणि स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या. मागणीच्या ठिकाणी बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांची संख्या वाढली आणि त्याचा परिणाम एसटीच्या तिकीट विक्रीवर झाला. (MSRTC Revenue Increase)
 
एका दिवसात ४५ कोटींची विक्रमी कमाई
 
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट हा एसटीच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाचा दिवस ठरला. या दिवशी एसटीने तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री केली. एसटीला सध्या दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याच्या तुलनेत ३१ ऑगस्टला सुमारे १० कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई झाली. (MSRTC Revenue Increase)
 
हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र
 
 
“एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार एसटीची सेवा पोहोचली पाहिजे. अनुत्पादक फेऱ्यांपेक्षा प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांवर अधिक फेऱ्या चालविणे, हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र आहे. ऑगस्टमध्ये झालेली ६६ कोटी रुपयांची वाढ योग्य दिशेने सुरू झालेल्या बदलाचे द्योतक आहे,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (MSRTC Revenue Increase)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर