एमपीएससी पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? मंत्री नरहरी झिरवाळ यांचे ओएसडी आरोपीच्या घरात भाडेकरू!

    06-Sep-2026   

 MPSC Paper Leak Case
मुंबई (MPSC Paper Leak Case) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची शंका उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) गणेश देवरे हे याप्रकरणातील आरोपीच्या घरी भाड्याने राहत असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, या प्रकरणात आपला कुठलाही सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण गणेश देवरे यांनी दिले आहे.
मंत्री नरहरी झिरवाळयांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे हे एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव पाटील याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे मुंबई विशेष शाखेच्या पथकाने गणेश देवरे यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली होती. (MPSC Paper Leak Case)
मात्र, या सगळ्यावर गणेश देवरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "अन्न व औषध प्रशासन विभागाचा एमपीएससीचा पेपर गट ब असल्यामुळे लोकसेवा आयोग घेत असतो. त्यामुळे लोकसेवा आयोग आणि मंत्रालयीन विभागाचा कुठलाही संबंध नाही. मी मुंबईत काम करत असताना माझा परिवार इथे राहतो आणि मी इथून ये-जा करतो. गौरव पाटील यांच्या घरात माझा परिवार भाडेकरू म्हणून राहतो हा निव्वळ योगायोग आहे. या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. तसे काही असते तर माझी चौकशी झाली असती. पेपरफुटीप्रकरणी आरोपींवर कार्यवाही सुरु आहे. काही माध्यमे माझे नाव घेऊन माझे फोटोही वापरत आहेत. लवकरच मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे."
हा निव्वळ योगायोग
"गौरव पाटीलच्या घरात मी भाडेकरू म्हणून राहत असल्यास यात माझा काय दोष? मी कुठल्याही चौकशीसाठी तयार आहे. मी माझ्या घरीच असून कुठेही गेलेलो नाही. यात काही तथ्य असते तर, पोलिसांनी माझी चौकशी केली असती. त्यामुळे हा शुद्ध योगायोग आहे," असेही ते म्हणाले. (MPSC Paper Leak Case)
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, "कुठल्याही मंत्र्याला त्याचे अधिकारी किंवा कर्मचारी कुठे राहतात हे कसे माहिती असणार? गेल्या दीड वर्षांपासून गणेश देवरे आमच्या विभागात काम करतात. ते चांगले काम करतात, इथवर मला माहिती आहे. पण पेपरफुटीप्रकरणात माझ्याकडे मंत्रालय कार्यालयात अशी कुठलीही माहिती आलेली नाही. पण देवरे त्यात दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल." (MPSC Paper Leak Case)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर