एमपीएससी परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणांचे संकेत; विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

 
MPSC Exam Reforms
 
मुंबई (MPSC Exam Reforms) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता, प्रश्नपत्रिका सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि परीक्षा व्यवस्थेबाबतच्या चिंतांची गांभीर्याने दखल घेतली. “अतिशय पारदर्शक पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. (MPSC Exam Reforms)
 
या बैठकीला शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 
परीक्षा प्रक्रिया अधिक सुदृढ आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, त्यात यूपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटीचे प्राध्यापक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. ही समिती राज्यातील विविध विभागांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संबंधित घटकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेणार आहे. पुण्यातही समितीकडून विशेष सल्लामसलत केली जाणार आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा होण्याची शक्यता आहे. (MPSC Exam Reforms)
 
दरम्यान, औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला. “प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल, अशाच सुधारणा सरकार करीत आहे. विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
प्रश्नपत्रिका निर्मितीपासून प्रत्यक्ष परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन तातडीने लागू करण्यात येतील. त्यामुळे भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीसारख्या घटना टाळण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास अधिक मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (MPSC Exam Reforms)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर