राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची ३ मुलांसह किल्ल्यावरून उडी; पती आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल

    05-Sep-2026   
Ashwini Paul Naldurg Fort Case 
 
धाराशिव: (Ashwini Paul Naldurg Fort Case) राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ (मोहिते) यांनी आपल्या तीन चिमुरड्या मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून १०० फूट खोल दरीत उडी मारून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत अश्विनी यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर एका चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तातडीने कारवाई करत अश्विनी यांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय अश्विनी पौळ या गुरुवारी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरील ’उपळी बुरुज’ येथे आल्या होत्या. त्यानंतर घडलेल्या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला.(Ashwini Paul Naldurg Fort Case)
 
अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वीरा ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा नेमका क्रम, कारणे आणि परिस्थिती याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Ashwini Paul Naldurg Fort Case)
 

वडिलांच्या तक्रारीनंतर पती आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल 
 
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. अश्विनी यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांच्या तक्रारीवरून पती मनोहर पौळ आणि सासरच्या इतर मंडळींविरोधात छळाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलीस तपासात समोर आले आहे की, अश्विनी या मुंबईत ’महाराष्ट्र सुरक्षा दलात’ (MSF - Maharashtra Security Force) कार्यरत होत्या. त्यांचे पती मनोहर हे रिक्षाचालक असून त्यांच्या सांगण्यावरून अश्विनी यांनी ४-५ महिन्यांपूर्वीच नोकरीचा राजीनामा दिला होता. गेल्या ३ महिन्यांपासून सासरच्या जाचाला कंटाळून त्या माहेरी (उमरगा) राहत होत्या. (Ashwini Paul Naldurg Fort Case)
 
क्रीडा क्षेत्रात शोककळा
 
अश्विनी पौळ यांच्या या टोकाच्या पाऊलामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कुस्ती क्षेत्रात त्या ’महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके जिंकून राज्याचा गौरव वाढवला होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब (आई, वडील, भाऊ) कुस्ती क्षेत्राशी जोडलेले आहे. एका कर्तबगार महिला खेळाडूचा आणि दोन निष्पाप मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने उमरगा तालुक्यासह संपूर्ण राज्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Ashwini Paul Naldurg Fort Case)
 

 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर