आदिवासी संस्कृतीचा ‘तारणहार’

 
Devchand Mahale
 
सह्याद्रीच्या कुशीतील पर्यावरण, शेती, साहित्य आणि आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक देवचंद महाले यांच्याविषयी...
 
खळखळ वाहती नदी-नाले,
तीच माझी चंद्रभागा;
उभ्या पावसात रोज भिजतो,
सुकून जातो कपड्याचा धागा...
 
या चार ओळी कवी देवचंद महाले यांच्या जीवनदृष्टीचे जणू प्रतिबिंबच. निसर्गाशी एकरूप झालेले जीवन, शेती-मातीशी जोडली गेलेली नाळ, ग्रामीण वास्तवाचे भान आणि पर्यावरणाविषयीची तळमळ त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. कवी, लेखक, पर्यावरण अभ्यासक, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता अशी बहुआयामी ओळख असलेल्या महाले यांनी, आदिवासी ग्रामीण भागात साहित्यकृती आणि सामाजिक उपक्रमांद्वारे वेगळा ठसा उमटवला आहे. आई-वडील अशिक्षित असूनही, शिक्षणाची ओढ त्यांनी कायमच जपली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यावर, १९९०च्या दशकात त्यांची भेट कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांशी झाली. ही भेटच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
 
त्यानंतर त्यांनी आदिवासी भागात ग्रंथालय चळवळ उभी केली. खेडोपाडी वाचनालये सुरू करून विद्यार्थी, युवक आणि शेतकरी यांना संघटित करण्याचे कार्यही हाती घेतले. ग्रामीण विकासासाठी ज्ञान आणि वाचन, हीच खरी शक्ती असल्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. पुढे महाराष्ट्रातील अनेक नामांकित सामाजिक आणि साहित्यिक संस्थांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ‘ग्रामविकास हीच खरी राष्ट्रसेवा’ मानून त्यांनी, पंचायतराज आणि ग्रामसभा बळकटीकरणाच्या संकल्पनाही ग्रामीण भागात रुजवल्या. ‘आदर्श गाव’ अभियान, युवक नेतृत्व विकास आणि लोकसहभागातून विकास ही संकल्पना त्यांनी विविध गावांत राबवली. १९९५ मध्ये अमेठी येथे युवक नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करताना, त्यांनी ग्रामीण विकासाचा प्रभावी दृष्टिकोनही मांडला होता. आदिवासी भागात कुर्‍हाडबंदी, व्यसनमुक्ती, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, मृदसंधारण आणि जलसंधारण यांसारख्या उपक्रमांत सक्रिय सहभागही त्यांनी घेतला. सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने गावातील २०० हेक्टर वनजमिनीवर वृक्षलागवडीसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने, आज हिरवाईने नटलेले जंगल उभे राहिले असून, त्याचा लाभ केवळ गावालाच नव्हे; तर आसपासच्या परिसरालाही होत आहे. शिवाय फळझाडे, औषधी वनस्पती आणि वृक्षलागवडीमुळे ग्रामीण रोजगारालाही मोठीच चालना मिळाली. पर्यावरणसंवर्धनासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. पश्चिम आदिवासी पट्ट्यातील बेकायदा वृक्षतोड, डोंगरांचे उत्खनन आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणार्‍या विकासकामांविरोधातही त्यांनी आवाज उठवला. ब्रह्मगिरी आणि अंजनेरी परिसरातील अनियंत्रित उत्खननाला विरोध करण्यासाठी, विविध संस्था आणि संघटनांसह त्यांनी अनेक आंदोलनेही केली. अंजनेरी पर्वतावरील जैवविविधता आणि दुर्मीळ गिधाडांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठीचे त्यांचे उल्लेखनीय असेच.
 
लेखन क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. विविध दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिकांतून त्यांनी पर्यावरण, ग्रामीण विकास, शेती, आदिवासी जीवन आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने स्तंभलेखन केले. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामसभांमध्ये पर्यावरण विषयावर व्याख्याने देत, जनजागृतीचे कार्यही त्यांनी केले आहे. देवचंद महाले हे संवेदनशील कवी, लेखक आणि मुक्त पत्रकार असून, आदिवासी संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्याचे जतन करण्याचा प्रयत्नच त्यांच्या साहित्यातून दिसतो. त्यांचा ‘इर्जुक’ हा कथासंग्रह आदिवासी जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडतो, तर ‘रास’ या कादंबरीत आदिवासी भागातील भूमाफियांचे वाढते जाळे, नामशेष होत चाललेली शेतीसंस्कृती आणि खळ्यातून हरवत चाललेली धान्याची रास यांचे अत्यंत वास्तववादी चित्रण केले आहे.
 
जंगलात लावले जाणारे हेतुपुरस्सर वणवे विझविण्याचे कार्यही त्यांनी केले असून, जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी ते आजही कार्यरत आहेत. गेल्या सहा-सात वर्षांपासून पेठ, सुरगाणा, हरसूल आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये ते जलपरिषदेच्या माध्यमातून कार्य करत आहेत. लोकसहभाग आणि श्रमदानातून ५००हून अधिक वनबंधारे उभारण्यातही त्यांचा वाटा सिंहाचा. ‘पाणी जपा, जीवन वाचवा’ हा संदेश ते सातत्याने समाजापर्यंत पोहोचवतात. आदिवासी संस्कृतीचे जतन हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य. विविध संस्थांच्या माध्यमातून साहित्य संमेलने, लोककला महोत्सव, लोकसंगीत, पारंपरिक वाद्ये आणि आदिवासी सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी ते प्रयत्नशील असतात.
 
त्यांच्या या कार्याची दखल शासनासह अनेक सामाजिक संस्थांनी घेतली असून, त्यांना विविध पुरस्कार आणि सन्मानांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या गावाला ‘निर्मल ग्राम’, ‘तंटामुक्त गाव’ आणि ‘संत तुकाराम वनग्राम’ यांसारखे प्रतिष्ठेचे सन्मान प्राप्त झाले. देवचंद महाले हे शासनाच्या ‘पर्यावरण कृती दल समिती’चे माजी सदस्य, तसेच ‘नदी प्रहरी’ म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. विविध सामाजिक संस्थांचे ते सल्लागार असून, पर्यावरण, ग्रामीण विकास, साहित्य आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी अविरत धडपडणार्‍या या जननायकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!
 
९४०४६८७६०८




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.
संबंधित मजकूर