मुंबई (Ashima Mittal) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जरांगे पाटील यांच्यात झालेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अत्यंत संवेदनशील परिस्थितीत शासनाची भूमिका मांडताना मित्तल यांनी संयम राखत संवाद सुरू ठेवला.
आयआयटी बॉम्बेतील सुवर्णपदकापासून यूपीएससीमधील देशातील बाराव्या क्रमांकापर्यंत आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीच्या ‘सुपर ५०’ उपक्रमापर्यंत त्यांची प्रशासकीय कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. आशिमा मित्तल यांनी IIT बॉम्बे येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मानववंशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. कॉर्पोरेट क्षेत्रात काही काळ काम केल्यानंतर त्यांनी नागरी सेवेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. (Ashima Mittal)
UPSC मध्ये देशात बारावा क्रमांक
२०१७च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत मित्तल यांनी अखिल भारतीय स्तरावर १२वा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले. प्रशिक्षणानंतर अहमदनगर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. पुढे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. (Ashima Mittal)
‘सुपर ५०’ची विशेष चर्चा
२०२२मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मित्तल यांच्या कार्यकाळातील ‘सुपर ५०’ उपक्रमाची विशेष चर्चा झाली. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांना JEE आणि NEETसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन व सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश होता. निवडक विद्यार्थ्यांना निवासी व्यवस्था, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यातील ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी JEE Main उत्तीर्ण केली, तर सात विद्यार्थ्यांनी JEE अँडव्हान्स मध्येही यश मिळवले. पुढील काळात या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना IIT आणि अन्य नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात या उपक्रमाचा हातभार लागला. याशिवाय ‘मिशन आत्मनिर्भर’च्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षणाच्या सुविधा विकसित करण्यावरही भर देण्यात आला. (Ashima Mittal)
आता जालन्याची जबाबदारी
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर २०२५ मध्ये आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सध्या त्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमोर आता प्रशासन आणि आंदोलक यांच्यात संवाद कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला असतानाही मित्तल यांनी संवाद सोडला नाही. त्यामुळे प्रशासनातील संयम आणि संवादकौशल्यासाठी त्यांची चर्चा होत आहे. (Ashima Mittal)