ठाणे (Pradeep Purnekar): ठाण्यात उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळा पूर्णेकर यांच्या हत्येने शहराच्या राजकीय वर्तुळासह मानपाडा-मनोरमानगर परिसर हादरला आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेशनगर येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयाजवळ असलेल्या पूर्णेकर यांच्यावर चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, चार राऊंड फायर करण्यात आले असून त्यापैकी दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. त्यानंतर धारदार शस्त्रानेही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी पूर्णेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Pradeep Purnekar)
या हत्याकांडानंतर ठाणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांच्या हालचालींचा माग काढला जात आहे. समोर आलेल्या फुटेजमध्ये चेहरा झाकलेले दोन व्यक्ती दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची अनेक पथके तपासात सहभागी करण्यात आली आहेत. (Pradeep Purnekar)
पाच संशयितांची नावे; दोघे पोलिसांच्या ताब्यात
तपासात निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा पाच संशयितांची नावे समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.. त्यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. (Pradeep Purnekar)
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या माहितीनुसार, उर्वरित संशयितांच्या शोधासाठी गुन्हे शाखा व पोलिसांची नऊ पथके कामाला लागली आहेत. परिसरातील तसेच प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासून हल्लेखोरांचा घटनास्थळी येण्यापासून ते पसार होईपर्यंतचा संपूर्ण मार्ग शोधला जात आहे. (Pradeep Purnekar)
नातेवाईकांचा संताप
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा संताप उफाळून आला आहे. जोपर्यंत हल्ल्यामागील सर्व आरोपी आणि सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुढे नेणार नाही, अशी भूमिका पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. ‘गोळी झाडणारे कोण, हल्ल्याचा आदेश कोणी दिला आणि त्यामागे नेमके कोण आहे?’ हा मुख्य प्रश्न असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. (Pradeep Purnekar)
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचे पार्थिव कापुरबावडी पोलिस ठाणे परिसरात आणण्यात आल्याची माहिती असून, मुलगा राम पूर्णेकर यांच्या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कुटुंबीयांनी सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Pradeep Purnekar)
‘हत्या करण्यापूर्वी रेकी’; मुलगा राम यांचा गंभीर आरोप
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वडिलांवर हल्ला होण्यापूर्वी परिसराची रेकी करण्यात आली होती. काही संशयित व्यक्ती यापूर्वी परिसरात दिसल्या होत्या, तसेच वडिलांना यापूर्वी धमक्याही मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्यांची पोलिसांकडून स्वतंत्र तपासणी सुरू आहे.राम पूर्णेकर यांनी काही राजकीय व्यक्तींवरही गंभीर आरोप केले आहेत. (Pradeep Purnekar)
हल्ल्यापूर्वी पोलिसांची नोटीस; उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हत्या
पूर्णेकर हे स्थानिक पातळीवर सक्रिय शिवसेना (उबाठा) नेते होते. हत्येच्या काही दिवस आधी त्यांनी उपोषण करण्याची तयारी केली होती आणि त्यासंदर्भात २८ सप्टेंबर रोजी पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याचाही तपासाच्या दृष्टीने विचार केला जात आहे. मात्र, सध्या पोलिसांनी हत्येमागील ठोस कारण जाहीर केलेले नाही. (Pradeep Purnekar)
राजकीय वैमनस्य की अन्य कारण? तपासासमोर अनेक प्रश्न
पूर्णेकर यांच्या हत्येमागे राजकीय वैमनस्य, वैयक्तिक वाद अथवा अन्य कारण यापैकी नेमके कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. कुटुंबीयांनी राजकीय वादाचा तसेच अन्य संभाव्य कारणांचा संशय व्यक्त केला आहे; परंतु तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही एका कारणाला अधिकृत निष्कर्ष मानता येणार नाही.या हत्याकांडामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आधीपासून असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही या घटनेकडे पाहिले जात आहे. मात्र, हत्येचा राजकीय कट होता की नाही, हे तपासातूनच निश्चित होणार आहे. (Pradeep Purnekar)
मनोरमानगरमध्ये तणाव; बंदची हाक
हत्येच्या घटनेनंतर मनोरमानगर आणि मानपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, रात्री उशिरा शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. (Pradeep Purnekar)