जंगलाची बाजू मांडणारा वकील

    03-Sep-2026   
 
Omkar Lad Wildlife Conservation
 
प्राणीप्रेमातून कायदा आणि संवर्धनाच्या क्षेत्रात वेगळी वाटचाल करत, पालघरच्या मानद वन्यजीव रक्षक पदापर्यंत झेप घेणार्‍या अ‍ॅड. ओमकार लाड यांच्याविषयी...
 
शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच जंगल आणि मानवी वस्त्यांतील अंतर कमी होत आहे. परिणामी साप, घुबड, माकड, घोरपड, कासव किंवा विविध पक्षी, मानवी वस्तीत आढळण्याच्या घटना आता नित्याच्याच आहेत. अशा वेळी भीतिपोटी वन्यजीवांना इजा करण्याऐवजी, त्यांचे संरक्षण आणि सुरक्षित पुनर्वसनासाठी पुढे येणारी माणसे महत्त्वाची ठरतात. वसईचे अ‍ॅड. ओमकार लाड हे अशाच वन्यजीवप्रेमींपैकी एक. प्राण्यांवरील प्रेमाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी वन्यजीव संवर्धनासाठी उभारलेले कार्य, आता महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेपर्यंत पोहोचले आहे. वनविभागाने त्यांची पालघर जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक म्हणून नियुक्ती केली.
 
लहानपणापासूनच प्राणी आणि निसर्गाची असलेली ओढ, पुढे त्यांच्या कार्याची प्रेरणा झाली. वन्यजीवांवरील अत्याचार रोखणे, जखमी किंवा संकटात सापडलेल्या प्राण्यांना मदत करणे आणि त्यांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. याच ध्यासातून त्यांनी ‘योरान’ या सामाजिक संस्थेचीही स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून, वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात वन्यजीव, प्राणी कल्याण आणि पर्यावरणसंवर्धनाशी संबंधित उपक्रम राबवण्यात आले आहेत. शहरी भागात भरकटलेल्या किंवा संकटात सापडलेल्या वन्यजीवांच्या बचावकार्यात, त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्पांपासून घुबड, माकड, घोरपड, कासव आणि विविध पक्ष्यांपर्यंत अनेक वन्यजीवांना सुरक्षितपणे बाहेर काढून, वनविभागाच्या मदतीने त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम त्यांनी केले. वन्यजीवांचे केवळ रेस्यू न करता त्यांची अधिकृत नोंद, योग्य हाताळणी आणि पुनर्वसनालाही त्यांनी महत्त्व दिले. मानवी वस्तीमध्ये वन्यजीव आढळल्यानंतर निर्माण होणारी भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी, स्थानिकांशी संवाद साधण्यावरही त्यांनी भर दिला.
 
ओमकार यांच्या कार्याची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे, कायद्याच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी, मुंबई उच्च न्यायालयाशी संबंधित ‘निमल वेल्फेअर ऑफिसर’ म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. प्राण्यांवरील क्रूरता, तसेच वन्यजीवांशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर मार्गाने हस्तक्षेप करत, त्यांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला. सध्या वसई न्यायालय, तसेच मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतानाही, त्यांचे वन्यजीव संवर्धनाचे काम सुरू आहे.
 
कायद्याचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्याकडेही त्यांचा भर असतो. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था आणि ग्रामीण भागात वन्यजीव संरक्षण कायदे, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध, सर्पांच्या विविध प्रजाती, पर्यावरणातील त्यांचे महत्त्व, तसेच सर्पदंश झाल्यावर घ्यायची प्राथमिक काळजीबाबतही त्यांनी जनजागृती केली आहे. विशेषतः साप दिसला की, त्याला मारण्याऐवजी वनविभाग किंवा प्रशिक्षित व्यक्तींशी संपर्क साधावा, हा संदेश त्यांनी यशस्वीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला. तुंगारेश्वर आणि मांडवी वनविभागाच्या साहाय्याने अभयारण्य स्वच्छता, पर्यावरणसंवर्धन आणि वन्यजीव जनजागृतीच्या उपक्रमांमध्येही त्यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपणाबरोबरच ग्रामीण व दुर्गम भागातील गरजूंना मदत, महिला सक्षमीकरण आणि मुलींसाठी ‘गुड टच-बॅड टच’ यांसारख्या उपक्रमांतही त्यांचा सहभाग राहिला. ‘कोविड’ काळात परिसरातील भटक्या श्वानांसाठी, अन्नाची व्यवस्थाही त्यांनी केली.
 
वन्यजीव संवर्धनाबरोबरच मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्याची गरजही ते अधोरेखित करतात. मानवी वस्तीत आलेला वन्यजीव धोकादायक असल्याचा सरसकट समज करण्याऐवजी, त्याच्या वर्तनाचा अभ्यास, योग्य बचावपद्धती आणि सुरक्षित पुनर्वसनला प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. पालघर जिल्ह्यातील शहरीकरण, जंगलांवरील वाढता दबाव, अधिवासाचे विभाजन, मानव-वन्यजीव संघर्ष आणि वन्यजीव तस्करी ही गंभीर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत कायदा, वन्यजीव संवर्धन आणि सामाजिक कार्याचा एकत्र अनुभव असलेली व्यक्ती, मानद वन्यजीव रक्षक म्हणून काम करणे महत्त्वाचे ठरते. वनविभागाला सहकार्य करणे, वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करणे, अवैध शिकार व तस्करी रोखण्यासाठी सहकार्य करणे आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रसंगी संवेदनशील हस्तक्षेप करणे, अशी मोठीच जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे.
 
वसईच्या एका तरुणाच्या प्राणिप्रेमातून सुरू झालेला प्रवास, आता संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या वन्यजीव संरक्षणाच्या जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. वकिलीच्या माध्यमातून कायद्याची बाजू मांडणारे आणि जंगलाच्या सीमेवर वन्यजीवांची बाजू घेणारे ओमकार लाड, ही त्यांची दुहेरी ओळखच त्यांच्या कार्याचे वेगळेपण सांगते. वन्यजीवांचे संरक्षण केवळ जंगलात होत नाही; ते समाजाच्या मानसिकतेत बदल घडवल्यावरही होते. त्या बदलासाठी कायद्याची ताकद, संवेदनशीलता आणि सातत्याने काम करण्याची तयारी घेऊन पुढे जाणार्‍या ओमकार लाड यांच्या नव्या जबाबदारीकडे, आता पालघरच्या वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर