इस्लाममध्ये 'पर्दा' म्हणजे हया आणि सन्मान, महिलांना समाजापासून तोडण्याचे साधन नव्हे

मुस्लिम राष्ट्रीय मंचाने अबुबकर यांचे महिलांविरोधी विधान फेटाळून लावले

    03-Sep-2026   

Muslim Nation
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी): केरळमधील 'समस्त केरळ जमीयतुल उलेमा'च्या कांतापूरम गटाचे महासचिव ए. पी. अबूबकर मुसलियार यांनी केलेल्या महिलांविरोधी वक्तव्याला मुस्लिम राष्ट्रीय मंचाने तीव्र विरोध दर्शवला आहे. "इस्लामने महिलांना कैद केलेले नाही, उलट त्यांना सर्वप्रथम अधिकार दिले आहेत. इस्लाममधील पर्दा हा लज्जा, शालीनता आणि सन्मानाचे प्रतीक आहे; समाजापासून महिलांना दूर ठेवण्याचे साधन नाही", अशा स्पष्ट शब्दांत मुस्लिम राष्ट्रीय मंचाने सुनावले आहे. मुसलियार यांनी महिलांनी घरातच राहावे आणि त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर येऊ नये, अन्यथा मोठी हानी होईल, असे वक्तव्य केले होते.(Muslim Nation)
 
मुस्लिम राष्ट्रीय मंचाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अबूबकर यांचे विधान केवळ धक्कादायक नाही, तर संपूर्ण समाजाला मागे नेणारे आहे. प्रथम परिपत्रक काढून महिलांनी पुरुषांसोबत व्यासपीठ सामायिक करू नये, असे सांगण्यात आले आणि त्यानंतर कोची येथील कार्यक्रमात त्याच परिपत्रकाचे समर्थन करण्यात आले. यावरून काही लोक आजही मुस्लिम मुलींनी प्रगतीच्या शर्यतीत मागेच राहावे, अशी मानसिकता बाळगून असल्याचे दिसून येते, असा मंचाचा आरोप आहे..(Muslim Nation)
 
मंचाने पुढे प्रश्न उपस्थित केला की, जर इस्लाम महिलांना घरातच बंद ठेवण्याचा संदेश देत असता, तर हजरत खदीजा यांनी व्यापार कसा केला असता आणि हजरत आयशा यांनी धार्मिक ज्ञानाचे शिक्षण समाजाला कसे दिले असते? इस्लामने महिलांना नेहमीच सन्मानाने समाजजीवनात सहभागी होण्याचा अधिकार दिला आहे, असेही मंचाने स्पष्ट केले..(Muslim Nation)
 
मुस्लिम राष्ट्रीय मंचाने म्हटले की, आजचा भारत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश देत आहे. केरळमधील मुस्लिम मुली डॉक्टर, शिक्षिका, वैज्ञानिक बनून देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना व्यासपीठावरून दूर ठेवण्याची भाषा करणे म्हणजे केरळच्या प्रगतिशील विचारसरणीचा तसेच प्रत्येक महिलेला समानतेचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाचाही अपमान आहे. कोणतेही परिपत्रक संविधानापेक्षा मोठे असू शकत नाही, असे नमूद करत मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या महिला सदस्यांनी या वक्तव्याचा उघडपणे निषेध केला. तसेच महिलांविरोधी हे परिपत्रक तातडीने मागे घेण्याची मागणी मंचाने केली आहे..(Muslim Nation)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर