मुंबई,(अभिनंदन परुळेकर) : घाटकोपर–मानखुर्द लिंक रोडवरील जय अंबे नगर तलाव वाचवण्यासाठी बुधवार दि.२ रोजी भाजपचे नगरसेवक सुषम गोपाळ सावंत यांच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन करण्यात आले.(Jay Ambe Nagar Lake Protest)
“अतिक्रमण हटवा, तलाव वाचवा” अशा घोषणांसह भाजपचे नगरसेवक सावंत आणि स्थानिक नागरिकांनी जलपर्णीने व्यापलेल्या तलावाच्या पात्रात उतरून प्रशासनाला वास्तव दाखवले. कथित भराव, अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाला भरघोस प्रतिसाद दिला.(Jay Ambe Nagar Lake Protest)
ज्येष्ठ रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, हा जलस्रोत पूर्वी सुमारे दोन एकरांपर्यंत पसरलेला होता. येथे गणेशमूर्ती विसर्जन आणि दशक्रिया विधी केले जात होते. आज मात्र तलाव जलपर्णी, शेवाळ, झाडी-झुडपे, कचरा आणि मलब्याने व्यापला आहे. सततच्या कथित भरावामुळे आणि बांधकामांमुळे तलावाचे मूळ क्षेत्र कमी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.(Jay Ambe Nagar Lake Protest)
भाजपचे नगरसेवक सावंत यांच्या म्हणण्यानुसार, "२०२४ पासून या प्रश्नाबाबत तक्रारी करण्यात येत असून त्यानंतरही अनेक लेखी निवेदने देण्यात आली. तरीही तलावाच्या स्थितीत कोणताही ठोस बदल झाला नाही. उलट, कथित अतिक्रमण वाढत गेले. तलाव परिसरात सुमारे ३० ते ४० लॉज, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने असून त्यांच्या परवानग्यांची तपासणी होणे आवश्यक आहे."(Jay Ambe Nagar Lake Protest)
जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, महसूल व भूमी अभिलेख विभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने संयुक्त तपासणी करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक सावंत यांनी केली. प्रत्येक आस्थापनेचा बांधकाम परवाना, व्यवसाय व लॉजिंग परवाना, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, पाहुणे नोंदवही, ओळख नोंदी आणि सीसीटीव्ही तपासण्यात यावेत.(Jay Ambe Nagar Lake Protest)
अनियंत्रित किंवा विनापरवाना निवासव्यवस्थेचा गुन्हेगारी, समाजविघातक अथवा राष्ट्रविरोधी कामांसाठी गैरवापर होऊ नये, अशी सुरक्षाविषयक चिंता नागरिकांनी व्यक्त केली. कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा आस्थापनेला दोषी ठरविण्यात आलेले नसून, पोलिसांनी निष्पक्ष तपास करून सत्य जनतेसमोर ठेवावे, असे भाजपचे नगरसेवक सावंत यांनी स्पष्ट केले.(Jay Ambe Nagar Lake Protest)
ही जमीन शासकीय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. त्याची अधिकृत खातरजमा करण्यासाठी प्रमाणित संयुक्त सर्वेक्षण करून तलावाचे अचूक क्षेत्रफळ, मूळ हद्द, मालकी, अधिकारक्षेत्र आणि कायदेशीर स्थिती जाहीर करावी. अधिकृत अभिलेखातून सिद्ध होणाऱ्या अतिक्रमणांवर कायद्यानुसार कारवाई करावी.(Jay Ambe Nagar Lake Protest)
“आज मी तलावात उतरलो, कारण प्रशासन अजून कारवाईत उतरलेले नाही. भराव थांबवा, अधिकृत सर्वेक्षण करा, कायद्याने सिद्ध होणारे प्रत्येक अतिक्रमण हटवा आणि हा तलाव नागरिकांसाठी सुंदर स्वरूपात पुन्हा उभा करा,” असे भाजपचे नगरसेवक सुषम गोपाळ सावंत यांनी सांगितले.(Jay Ambe Nagar Lake Protest)
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
- नवीन भराव, मलबा टाकणे आणि अनधिकृत बांधकाम तातडीने थांबवावे.
- संयुक्त सर्वेक्षण करून तलावाची हद्द प्रत्यक्ष जागेवर निश्चित करावी.
- सर्व लॉज, दुकाने, परवाने आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी करावी.
- सिद्ध अतिक्रमणांवर योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर कारवाई करावी.
- जलपर्णी, कचरा व गाळ वैज्ञानिक पद्धतीने काढून पाण्याची गुणवत्ता तपासावी.
- पाण्याचे नैसर्गिक मार्ग मोकळे करून काठ मजबूत करावेत; सुरक्षा कठडे, प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही आणि हरित पट्टा उभारावा.
- एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून वेळबद्ध पुनरुज्जीवन आराखडा आणि कारवाई अहवाल प्रसिद्ध करावा.
“हा लढा कोणत्याही समाजाच्या, कायदेशीर रहिवाशांच्या किंवा कायदेशीर व्यवसायाच्या विरोधात नाही. हा लढा अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आहे.मुंबईच्या पूर्व प्रवेशमार्गावर नैसर्गिक जलस्रोताची झालेली ही अवस्था शहराच्या प्रतिमेवर कलंक आहे. आमची एकच मागणी आहे.अतिक्रमण हटवा आणि जय अंबे नगर तलावाचे सुंदर, सुरक्षित व पर्यावरणपूरक पुनरुज्जीवन करा. प्रत्यक्ष कारवाई सुरू होईपर्यंत हा लोकशाही लढा सुरू राहील.”असे भाजपचे नगरसेवक सावंत यांनी स्पष्ट केले.(Jay Ambe Nagar Lake Protest)