पुणे (Vidyanand Bapat) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील डीजे, लाऊडस्पीकर आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावर ठाम भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गणेशोत्सवाला विरोध नसून, ध्वनीप्रदूषणाला विरोध असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले आहे.
डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत
पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या आवाजात डीजे आणि लाऊडस्पीकर वाजवण्यास आक्षेप घेतला. मोठ्या आवाजामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगत त्यांनी ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका मांडली. (Vidyanand Bapat)
आपण गणेशोत्सवाच्या विरोधात नसून ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आहोत, असे बापट यांनी स्पष्ट केले आहे. डीजे किंवा लाऊडस्पीकरचा वापर करायचा असल्यास तो बंदिस्त जागांपुरता मर्यादित ठेवावा, अशी त्यांची भूमिका आहे.
‘घटं भिन्द्यात्, पटं छिन्द्यात् ...’ सुभाषितामुळेही सोशल मीडियावर चर्चा
विद्यानंद बापट यांनी एका प्रसंगी “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्...” हे संस्कृत सुभाषित उद्धृत केले होते. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा झाली असून, या सुभाषितावर आधारित अनेक रिल्सही प्रसारित होत आहेत.
या सुभाषिताचा साधारण अर्थ “मडके फोडावे, वस्त्र फाडावे, गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे” असा सांगितला जातो. (Vidyanand Bapat)
कोण आहेत विद्यानंद बापट?
विद्यानंद बापट यांची कोणतीही ठोस राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसल्याचे सांगितले जाते. ३७ वर्षीय विद्यानंद बापट पुण्यातील बीपीओ क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असून, गेल्या आठ वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्यास आहेत.
पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांच्या उपक्रमांमध्ये बापट सहभागी होत असल्याचे सांगितले जाते. सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. (Vidyanand Bapat)
पुण्यात बापट यांच्यावर हल्ला
दरम्यान, ३ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात माध्यमांशी संवाद साधत असताना विद्यानंद बापट यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना समोर आली. डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या त्यांच्या भूमिकेवरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. (Vidyanand Bapat)
मारहाण करणाऱ्या व्यक्तीने बापट हे नास्तिक असून त्यांची भूमिका गणेशोत्सवविरोधी असल्याचा आरोप केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बापट यांनी आपण गणेशोत्सवाच्या विरोधात नसून ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेतल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.
हल्ल्यानंतर बापट यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (Vidyanand Bapat)