जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी; एका रौप्यसह ३ उत्कृष्टता पुरस्कार, राज्य शासनाकडून रोख पारितोषिके जाहीर

    29-Sep-2026   
           
 
WorldSkills Shanghai 2026
 
मुंबई: चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्डस्किल्स शांघाय २०२६’ या जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या पाच युवा कौशल्यवंतांनी भारताचे प्रतिनिधित्व करत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत एक रौप्यपदक आणि तीन ‘मेडलियन ऑफ एक्सलेन्स’ (उत्कृष्टता पुरस्कार) पटकावत महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या युवा प्रतिनिधींनी मिळवलेले यश हे राज्याच्या कौशल्य विकास परिसंस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, अशा शब्दात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विजेत्यांचे कौतुक केले. (WorldSkills Shanghai 2026)
 
शांघाय येथे दि. २२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित या स्पर्धेत जगभरातील ६८ देशांतील युवा कौशल्यवंत ६३ प्रकारच्या कौशल्यांमध्ये सहभागी झाले होते. भारतीय संघात समाविष्ट असलेल्या महाराष्ट्राच्या पाच प्रतिनिधींनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये कोविड गंग्राडे याने 'डिजिटल इंटरऍक्टिव्ह मिडिया' प्रकारात रौप्यपदक पटकावले. तर खुशराज राठोड (आयटी नेटवर्क एडमिनिस्ट्रेशन), संपदा देसाई (केमिकल लेबोरेट्री तंत्रज्ञान) आणि तहसीन सुतार (ब्युटी थेरपी) यांनी 'उत्कृष्टता पदक' मिळवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.याशिवाय, महाराष्ट्राच्या हर्ष पवार याने ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या ‘ग्लोबल स्किल चॅलेंजस २०२६’ मधील 'थ्री-डी डिजिटल गेम आर्ट' या प्रकारात रौप्यपदक पटकावून उल्लेखिनीय यश मिळवले. (WorldSkills Shanghai 2026)
 
विजेत्यांना रोख पारितोषिके जाहीर
 
जागतिक व राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या गुणवंतांसाठी राज्य शासनाकडून विशेष रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. शांघाय व ऑस्ट्रेलिया स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कोविड गंग्राडे आणि हर्ष पवार यांना प्रत्येकी ३ लाख रुपये तर उत्कृष्टता पदक विजेते: खुशराज राठोड, संपदा देसाई व तहसीन सुतार यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर केली आहेत. (WorldSkills Shanghai 2026)
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर