महिला शेतकरी शेतीची खरी सूत्रधार आणि कणा : मोहिनी मोहन मिश्र

दिल्लीत भारतीय किसान संघाच्या महिला किसान कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन

    29-Sep-2026   
Women Farmers in Indian Agriculture
 
मुंबई (Women Farmers in Indian Agriculture) : भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्र आणि अखिल भारतीय महिला संयोजिका मंजू दीक्षित यांनी दिल्लीतील किसान संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय किसान संघ ही देशातील सर्वांत मोठी शेतकरी संघटना आहे. देशातील ६० हजारांहून अधिक गावांमध्ये ग्राम समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्यामध्ये ४२ लाखांहून अधिक महिला व पुरुष शेतकरी कार्यकर्ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे ७ लाख महिला शेतकरी कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भारतात पेरणी, लावणी, कापणी, तण नियंत्रण आणि पशुपालन यांसारखी शेतीची ६० ते ८० टक्के कामे महिलाच सांभाळतात. त्यामुळे महिला या शेतीच्या खऱ्या सूत्रधार आणि कणा आहेत, असेही त्यांनी सांगितले. (Women Farmers in Indian Agriculture)
 
माध्यमांना संबोधित करताना त्यांनी पुढे सांगितले की, महिला शेतकरी पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेले पारंपरिक कृषिज्ञान जतन करण्यासोबतच देशी बियाण्यांचे संवर्धन आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘गौ कृषी वाणिज्यम्’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे, रसायनमुक्त अन्नासाठी ‘गौ आधारित जैविक शेती व नैसर्गिक शेती’ प्रत्यक्ष शेतात रुजवणे तसेच कुटुंब आणि समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यातही महिलांचे योगदान अग्रणी आहे. कृषी, दुग्ध उत्पादन आणि ग्रामीण हस्तकलेच्या माध्यमातून महिला केवळ आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करत नाहीत, तर आता कृषी व्यवस्थापन आणि निर्णयप्रक्रियेतही सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. (Women Farmers in Indian Agriculture)
 
पुढे ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारतातील महिला शेतकऱ्यांना समाजात ‘शेतकरी’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणे तसेच शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानासमोरील आव्हाने अधोरेखित करण्यासाठी भारतीय किसान संघातर्फे अखिल भारतीय महिला किसान कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. हे संमेलन ३० सप्टेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार असून, सकाळी ९ वाजता संमेलनाला सुरुवात होईल. देशभरातील सर्व राज्यांमधील महिला शेतकरी कार्यकर्त्या या संमेलनात सहभागी होणार आहेत. संमेलनादरम्यान कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत विशेष योगदान देणाऱ्या देशभरातील निवडक महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. (Women Farmers in Indian Agriculture)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर