जगात अनेक संधी, या संधींशी जुळवून घेणे गरजेचे, विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    29-Sep-2026   
                           

 Rojgar Mahakumbh 2026 
 
मुंबई: जीवनात स्थितप्रज्ञ राहणे कामाचे नाही. सतत वाहते राहायला हवे. सतत नवीन ज्ञान घेतले पाहिजे. आज जगात अनेक संधी असून या संधींशी आपण जुळणे गरजेचे आहे. या संधींशी तुम्हाला जोडण्यासाठी आमचे सरकार आहे. आजचा हा रोजगार मेळावा सेवा संकल्पाअंतर्गत तरुणाईची सेवा करत या तरुणाईला सेवेकरी करून त्यांना मानव संसाधनात परिवर्तित करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Rojgar Mahakumbh 2026)
 
मंगळवारी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ येथे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात' ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागला, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राज्यभरातून ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रणालीद्वारे हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाव्दारे रोजगार मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. (Rojgar Mahakumbh 2026)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे प्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण केली असून या २५ वर्षात आपल्या देशाला प्रगतीची नवी शिखरे गाठता आली. देशाची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली. या पार्श्वभूमीवर 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून कोकण व नाशिक विभागातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार आणि स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा आहे." (Rojgar Mahakumbh 2026)
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारावर शासनाचे कामकाज सुरू
 
"आज आपला देश तारुण्याने मुसमुसलेला देश आहे. देशाचे सरासरी वय २८ वर्षे आहे. देशात ६५ टक्के लोकसंख्या रोजगारक्षम आहे. त्यामुळे देशामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार, मानव संसाधनाची निर्मिती हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, ज्याच्या आधारावर २०४७चा विकसित भारत आपण तयार करू शकणार आहोत. गरीबी मुक्त, बेरोजगारी मुक्त, रोगमुक्त या आपल्या स्वप्नाकडे जाण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारावर ही व्यवस्था उभी करायची आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला 'अंत्योदय' आणि 'एकात्म मानव दर्शन' हा विचार समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणारा आहे. याच विचारावर आधारित शासनाचे कामकाज सुरू आहे," असे त्यांनी सांगितले. (Rojgar Mahakumbh 2026)
 
बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवीन कौशल्ये आत्मसात करावी
 
ते पुढे म्हणाले की, "केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार (एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग) सातत्याने 'अपस्किलिंग' आणि कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. जगात २८ हून अधिक देशांमध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आपण शिक्षण घेत असताना त्यातून कौशल्य किती मिळतो याचा विचार तरुणांनी करावा. केवळ वेगवेगळ्या डिग्री घेऊन उपयोग नाही. त्या डिग्रीला अनुरूप कौशल्य आपल्याला मिळते का याचा विचार होणे गरजेचे आहे. एकीकडे उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे, तर दुसरीकडे तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे. या दोघांना जोडणारा भक्कम दुवा म्हणून हे रोजगार मेळावे काम करत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार युवकांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करावीत," असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. (Rojgar Mahakumbh 2026)
 
प्रत्येक तालुक्यात किमान तीन रोजगार मेळावे - मंत्री मंगलप्रभात लोढा
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदयाचा सिद्धांत दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच सिद्धांताच्या आधारे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जातात. मोठे रोजगार मेळावे न करता लहान लहान रोजगार मेळावे करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार या वेळी केवळ आयटीआयमधील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता सर्व स्तरांतील तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन लहान रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. केवळ मेळावे न घेता, विद्यार्थ्यांना रोजगार मिळावेत यासाठी ७ दिवसांचे मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, आतापर्यंत ६१ हजार मुला-मुलींनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या मेळाव्यासाठी १ लाखांपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली असून, किमान ७० टक्के तरुणांना रोजगार किंवा स्वरोजगाराशी जोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही." (Rojgar Mahakumbh 2026)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर