संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर वाट लावू - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपाइला सर्व समाजघटकांचा पक्ष बनवणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    29-Sep-2026
                 
 Ramdas Athawale Raigad 
 
रायगड :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात मोठी सार्वभौम लोकशाही आणि महान संविधान दिले आहे. जर कोणी हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याची वाट लावून टाकू असा थेट व कडक इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिला. सुधागड रिपाइंतर्फे रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त रविवारी दि. २७ सप्टेंबर रोजी पालीत रिपाइंचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन रिपाइं चे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनावळे यांनी केले होते. (Ramdas Athawale Raigad)
 
सूर्य, चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत हे संविधान पूर्णपणे अबाधित राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तुमचं गाव आहे पाली, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले वाली, अशा आपल्या खास आणि प्रभावी काव्यपंक्तींनी उत्तर देत ना.रामदास आठवले यांनी उपस्थितांमध्ये नवा उत्साह भरला. या सोहळ्याच्या निमित्ताने पाली शहरात ढोल-ताशांच्या गजरात आणि पक्षाच्या जयघोषात भव्य व वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमापूर्वी ना.रामदास आठवले यांनी पालीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन बहुजन महापुरुषांना भावपूर्ण अभिवादन केले. (Ramdas Athawale Raigad)
 
संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले असून जात, धर्म, भाषा कोणतीही असली तरी प्रत्येकाला समान अधिकार आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनुसार गोरगरीब समाजासाठी काम करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष केवळ फोटो काढण्यापुरता मर्यादित न राहता पक्षाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अजेंडा प्रत्यक्ष समाजात राबविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मत्स्यपालन योजना, जनधन योजना यांसह केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत. या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ समाजातील गरजू घटकांना मिळवून दिला पाहिजे, असे ते म्हणाले. सरकारचा पैसा हा कोण्या एका समाजाचा नसून सर्व नागरिकांचा आहे आणि त्या निधीवर प्रत्येक नागरिकाचा हक्क असल्याचेही ना.रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. (Ramdas Athawale Raigad)
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा संदर्भ देताना त्यांनी सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी केलेल्या मदतीचा उल्लेख केला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधण्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale Raigad)
 
रिपब्लिकन पक्षाला सर्व समाजघटकांचा पक्ष बनविण्याची भूमिका मांडताना ‘एका जातीच्या मतांवर निवडून येणे शक्य नाही,’ असे त्यांनी सांगितले. कुणबी, मराठा, मुस्लिम यांच्यासह सर्व समाजांना पक्षाशी जोडले पाहिजे. भारताचा नागरिक कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा भाषेचा असला तरी तो रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होऊ शकतो. हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारशी तसेच विविध समाजघटकांना सोबत घेऊन पक्षाची वाटचाल करण्याची गरज असल्याचे ना.रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. (Ramdas Athawale Raigad) 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची कामे होत असल्याचे सांगत ना.रामदास आठवले यांनी रस्ते, बससेवा, रेल्वे आणि रेल्वे स्थानकांमध्ये झालेल्या सुधारणांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून आपण एनडीएसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य जनतेसाठी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Ramdas Athawale Raigad)
 
या कार्यक्रमाला माजी खासदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील तसेच रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनावळे, प्रदेश युवक अध्यक्ष पप्पू कागदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, राज्य सचिव सूर्यकांत वाघमारे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कसारे, कोकण प्रदेश संघटक रवींद्रनाथ ओव्हाळ, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक, जिल्हा प्रवक्ते मोहन गायकवाड, ॲड. सुशील गायकवाड, निशांत पवार, गोपीनाथ सोनवणे, सुधागड तालुका अध्यक्ष भगवान शिंदे, युवक अध्यक्ष भावेश गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य शर्मिला बोडके, उपसभापती संदेश शेवाळे, नगराध्यक्ष पराग मेहता, अनुपम कुलकर्णी, आरिफ मणियार यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ramdas Athawale Raigad)
 
 
 




संबंधित मजकूर