माजी सैनिक सेवा परिषदेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापुरात!
२८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ३५० माजी सैनिक प्रतिनिधी सहभागी होणार; माजी सैनिकांचे कल्याण, राष्ट्रसेवा, सामाजिक कार्य आणि आगामी उपक्रमांवर होणार चर्चा
मुंबई (Ex-Servicemen Parishad 27th AGM) : अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान कोल्हापूर येथील श्री क्षेत्र कणेरी मठात आयोजित करण्यात आली आहे. आध्यात्मिक, सामाजिक आणि सेवाकार्याच्या समृद्ध परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कणेरी मठाच्या परिसरात होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे ३५० माजी सैनिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात राज्य आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या कुटुंबांचे प्रतिनिधी तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांशी संबंधित कार्यकर्ते सहभागी होतील. महाराष्ट्राच्या विविध भागांतील, विशेषतः कोल्हापूर परिसरातील माजी सैनिकांचाही या बैठकीत सहभाग राहणार आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
माजी सैनिकांचा अनुभव, शिस्त, नेतृत्वगुण आणि समर्पणभाव यांचा व्यापक समाज आणि राष्ट्रहितासाठी उपयोग करून घेण्याची संकल्पना ही अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या कार्यामागे आहे. माजी सैनिकांसाठी राष्ट्रसेवा आणि सामाजिक बांधिलकीचे व्यासपीठ उभारण्याची सुरुवात १९९२ मध्ये उत्तर प्रदेशात ‘पूर्व सैनिक सेवा परिषद’ या नावाने झाली. पुढे या संकल्पनेचा देशभर विस्तार झाला आणि नोव्हेंबर १९९५ मध्ये पहिले अखिल भारतीय अधिवेशन झाले. त्यानंतर १४ सप्टेंबर १९९९ रोजी दिल्ली येथे ‘अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद’ या नावाने राष्ट्रीय संघटनेची औपचारिक नोंदणी करण्यात आली. तीन दशकांहून अधिक काळात परिषदेने २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये संघटनात्मक जाळे उभे केले असून अनेक राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये तिचे कार्य सुरू आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
‘सैनिक गणवेशातून निवृत्त होतो; मात्र राष्ट्रसेवेतून कधीही निवृत्त होत नाही,’ हा परिषदेच्या कार्याचा मूलभूत दृष्टिकोन आहे. भारतीय सशस्त्र दलात दीर्घकाळ सेवा केल्यानंतर प्राप्त झालेली शिस्त, नेतृत्वक्षमता, व्यवस्थापनाचा अनुभव, सांघिक भावना आणि राष्ट्रनिष्ठा यांचा समाजाच्या विविध क्षेत्रांत उपयोग करणे, हे परिषदेच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
२७व्या राष्ट्रीय वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन इन्फंट्री स्कूलचे कमांडंट मेजर जनरल धनंजय जोशी, एव्हीएसएम, व्हीएसएम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख आणि परिषदेचे मार्गदर्शक प्रदीप जोशी, महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदाधिकारी व सैनिक सदस्य उपस्थित राहणार आहेत. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
कोल्हापुरात होणारी ही २७वी राष्ट्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा केवळ संघटनात्मक बैठक नसून देशभरातील माजी सैनिकांना एका राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आणणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. मुंबईच्या ‘नमस्ते शौर्य फाउंडेशन’तर्फे १९७१च्या युद्धावरील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी पाहुण्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
तीन दिवसीय राष्ट्रीय बैठक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न होणार असून राज्याचे मंत्री शंभूराज देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी देशभरातून सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार, राष्ट्रसेवा आणि संघटनात्मक कार्याच्या आगामी दिशेवर विचारमंथन तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
परिषदेची प्रमुख उद्दिष्टे
राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी माजी सैनिकांना संघटित करणे.
राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि अंतर्गत सुरक्षेसाठी माजी सैनिकांच्या अनुभवाचा उपयोग करणे.
ग्रामीण आणि दुर्गम भागांतील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक विकासासाठी योगदान देणे.
माजी सैनिक, वीरनारी आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी कार्य करणे.
निवृत्तीनंतर माजी सैनिकांचे सन्मानपूर्वक आणि स्वावलंबी पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करणे.
हुतात्मा सैनिक आणि युद्धवीरांच्या स्मृती जतन करणे.
नव्या पिढीमध्ये देशभक्ती, कर्तव्यभावना आणि राष्ट्रीय इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करणे.
सैनिक कुटुंबांच्या कल्याणासाठी कार्य
परिषदेने २००१ मध्ये ‘सैनिक परिवार कल्याण न्यास’ची स्थापना केली. युद्धात किंवा दहशतवादविरोधी कारवायांमध्ये बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांसह गरजू माजी सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी या माध्यमातून कार्य केले जाते. माजी सैनिकांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक मदत, शिष्यवृत्ती आणि गरजू वीरनारींना आर्थिक सहाय्य देणे, हे या कार्यातील महत्त्वाचे भाग आहेत. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
युद्धवीर आणि हुतात्मा कुटुंबांप्रती कृतज्ञता
परिषदेने विविध प्रसंगी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे. १९९९ च्या कारगिल युद्धानंतर रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी सैनिकांना आवश्यक मदत तसेच कारगिल हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सन्मानपत्र देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यात आले. २००२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय लष्करी लामबंदीदरम्यान हुतात्मा सैनिकांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही परिषदेला देण्यात आली होती. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
राष्ट्रीय इतिहास आणि युवकांना जोडणारे उपक्रम
स्वातंत्र्यलढ्याचा आणि भारतीय लष्करी इतिहासाचा वारसा जतन करणे, हेही परिषदेच्या कार्यातील महत्त्वाचे अंग आहे. एप्रिल १९९७ मध्ये मणिपूरमधील मोइरांग येथून दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत काढण्यात आलेली ‘ध्वज यात्रा’ हा या कार्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. या यात्रेतून ‘नेताजी-आझाद हिंद सेना स्मारक न्यास’ या उपक्रमाला प्रेरणा मिळाली. परिषद आणि संबंधित संस्थांच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, आझाद हिंद सेना दिन तसेच अन्य राष्ट्रीय स्मृतिदिन साजरे केले जातात. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान आणि राष्ट्रासाठी सैनिकांनी दिलेले बलिदान शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
‘वीर सैनिक ग्राम गौरव योजना’
परिषदेच्या उल्लेखनीय उपक्रमांपैकी ‘वीर सैनिक ग्राम गौरव योजना’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. युद्ध किंवा शांततेच्या काळात शौर्य दाखविणाऱ्या वीर सैनिकांचा, शौर्यपदक विजेत्यांचा आणि हुतात्म्यांचा त्यांच्या जन्मगावी सन्मानपूर्वक गौरव करणे, त्यांच्या स्मृती जतन करणे आणि त्याचबरोबर त्या गावाच्या सामाजिक विकासाला चालना देणे, ही या योजनेमागील संकल्पना आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)
बैठकीत पुढील विषयांवर सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय होणार :
संघटनात्मक विस्तार आणि बळकटीकरण
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांशी संबंधित प्रश्न
राज्य आणि जिल्हास्तरावरील कार्याचा आढावा
आगामी सामाजिक आणि राष्ट्रसेवेच्या उपक्रमांचे नियोजन
युवक पिढीशी संवाद
राष्ट्रीय इतिहास आणि सैनिकांच्या योगदानाविषयी जनजागृती
ग्रामीण आणि दुर्गम भागांतील सेवाकार्य
आगामी वर्षातील कार्यक्रमांचे नियोजन
महाराष्ट्राची भूमिका
महाराष्ट्राच्या भूमीत होत असलेली ही राष्ट्रीय बैठक राज्यातील माजी सैनिकांसाठीही महत्त्वाची संधी ठरणार आहे. देशातील विविध भागांत कार्यरत असलेल्या माजी सैनिकांच्या संघटनांशी महाराष्ट्रातील माजी सैनिकांचा थेट संवाद वाढवणे, विविध राज्यांतील कार्यपद्धतींची माहिती आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे तसेच भविष्यातील संयुक्त उपक्रमांना चालना देणे, या दृष्टीने या बैठकीचे महत्त्व आहे. ‘राष्ट्र प्रथम – सेवा, साहस आणि सन्मान’ या भावनेतून माजी सैनिकांना एकत्र आणून त्यांच्या अनुभव आणि सामर्थ्याचा राष्ट्रनिर्माणासाठी उपयोग करण्याच्या परिषदेच्या प्रयत्नांना २७वी राष्ट्रीय बैठक नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. (Ex-Servicemen Parishad 27th AGM)