'ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी' मोबाइल अ‍ॅपचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण

दि. २ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार "माऊलींच्या ओव्यांचा उत्सव"

    29-Sep-2026   

 

Dnyaneshwari Mobile App 

मुंबई (Dnyaneshwari Mobile App) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत आणि मेराक इव्हेंट्स आयोजित 'ज्ञानरंग : माऊलींच्या ओव्यांचा उत्सव' हा सोहळा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते 'ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी' या मोबाइल अॅपचे लोकार्पण देखील होईल. या अ‍ॅपमुळे माऊलींची ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक सहजपणे पोहोचण्यास मदत होईल अशी माहिती आहे. (Dnyaneshwari Mobile App)
 
'ज्ञानाचा अमृतसागर' हे ब्रीदवाक्य घेऊन आलेल्या या अ‍ॅपद्वारे माऊलींच्या ओव्या रोजच्या जीवनात ऐकता, वाचता आणि समजून घेता येणार आहेत. ओवीश्रवण, ओवी ऐकताना शब्दागणिक वाचन करता येईल असे 'शब्दानुसरण', सोप्या मराठीतील सुलभार्थ आणि माऊलींच्या कथा ही या अ‍ॅपची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, भगवद्गीतेच्या श्लोकांसोबत अर्जुन, श्रीकृष्ण, संजय आणि धृतराष्ट्र या पात्रांचे अ‍ॅनिमेटेड चित्रणही अ‍ॅपमध्ये पाहायला मिळणार आहे. २ ऑक्टोबरनंतर हे अ‍ॅप 'गूगल प्ले स्टोअर' आणि 'अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर'वर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध होईल. या अ‍ॅपची संकल्पना व्हॅल्युएबल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांची आहे. (Dnyaneshwari Mobile App)
 
याच सोहळ्यात सरसंघचालकांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांसह 'संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण' ही मालिका यूट्यूबवर प्रसारित केली जाईल. आजच्या धावपळीच्या युगात ज्यांना ज्ञानेश्वरीचे वाचन करणे शक्य होत नाही, त्यांना ती सहज ऐकता यावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाची संकल्पना आणि ज्ञानेश्वरीचे वाचन रेणुका देशकर यांनी केले असून, श्रीमद्भगवद्गीता वाचन श्रीनिवास वर्णेकर यांनी केले आहे. यास शैलेश दाणी यांचे संगीत व ध्वनीमुद्रण लाभले आहे. रसिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे आधी आसनस्थ व्हावे असे आवाहन मेराक इव्हेंटसच्या मंजिरी हेटे यांनी केले आहे. (Dnyaneshwari Mobile App)
 
सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी
 
लोकार्पण सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या रचनांवर आधारित एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि केतकी चैतन्य यांचे गायन रंगणार असून, डॉ. संजय उपाध्ये यांचे निरूपण लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करतील. (Dnyaneshwari Mobile App)
 
"ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे. नव्या पिढीपर्यंत आणि जगभरातील जिज्ञासूंपर्यंत ती आजच्या आधुनिक माध्यमातून पोहोचावी, या भावनेतून हे अ‍ॅप साकारले आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणे हा आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे." (Dnyaneshwari Mobile App)  
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर