मुंबई : ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या २२२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात राष्ट्रगीत आणि समारोप संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाला. मात्र, या ऐतिहासिक प्रसंगी एक खळबळजनक प्रकार समोर आला. राष्ट्रीय गीत ’वन्दे मातरम्’ सुरू असतानाच, सोसायटीच्या ‘बोर्ड ऑफ ट्रस्टी’चे चेअरमन, माजी कुलगुरू आणि माजी खा. प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर सभागृह सोडून बाहेर पडल्याने नवा वाद पेटला आहे. त्यांच्या या कृतीवर सोसायटीच्या सदस्यांनी तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे. (Bhalchandra Mungekar Vande Mataram Controversy)
मिळालेल्या माहितीनुसार, सभा संपताना जेव्हा ‘वन्दे मातरम्’चे गायन सुरू झाले, तेव्हा सर्व सदस्य आदराने उभे राहिले होते. मात्र, गीताची सुरुवातीची केवळ दोन कडवी संपताच, डॉ. भालचंद्र मुणगेकर तिथून तडक निघून गेले. राष्ट्रभावना आणि शिष्टाचाराला बगल देत, वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने असे वर्तन केल्यामुळे सभागृहातील उपस्थित सदस्य थक्क झाले.
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर मुणगेकर थेट चहापानाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचार्याकडे चहा मागितला. मात्र, त्या कर्मचार्याने दाखवलेले राष्ट्रीय भान कौतुकाचा विषय ठरले आहे. त्या कर्मचार्याने थेट देशाच्या माजी खासदाराला चहा देण्यास स्पष्ट नकार दिला. (Bhalchandra Mungekar Vande Mataram Controversy)
"जोपर्यंत आतमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण जागेवरून हलू शकत नाही आणि मी चहा देऊ शकत नाही,” असे खडे बोल या कर्मचार्याने मुणगेकरांना सुनावले. (Bhalchandra Mungekar Vande Mataram Controversy)
डॉ. भालचंद्र मुणगेकरांची सारवासारव
"वन्दे मातरम्’ची दोन कडवी झाल्यानंतर मी सभागृहातून बाहेर पडलो, हे खरे आहे. पण हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता. त्यामुळे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ संपेपर्यंत थांबणे बंधनकारक नव्हते,” असा अजब दावा डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी केला. (Bhalchandra Mungekar Vande Mataram Controversy)
‘संस्थात्मक कार्यक्रमात राजकीय विचार’
मुणगेकर यांच्या या भूमिकेवर ‘एशियाटिक सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी टीका केली. सांस्कृतिक आणि संस्थात्मक कार्यक्रमात राजकीय विचार आणल्याचा आरोप त्यांनी मुणगेकर यांच्यावर केला. अलीकडील राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना, सहस्रबुद्धे यांनी ओमर अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांनीही संपूर्ण ‘वन्दे मातरम्’च्या सादरीकरणात सहभाग घेतल्याचे सांगितले. काँग्रेसकडून या विषयाचे राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली. (Bhalchandra Mungekar Vande Mataram Controversy)