काजूबागेत स्थानिकच तारणहार

    28-Sep-2026   
 
Cashew Agroforestry Biodiversity Sindhudurg
 
सिंधुदुर्गातील काजूच्या बागांमध्ये स्थानिक वृक्ष टिकवून ठेवल्यास मधुरसाहारी पक्षी आणि फुलांची विविधता जपण्यास मोठी मदत होत असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. एकपिकी काजू लागवडीपेक्षा स्थानिक वृक्ष असलेल्या बागा जैवविविधतेसाठी अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत. त्याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
 
पश्चिम घाटातील काजूच्या बागांकडे केवळ कृषी उत्पादनाचे क्षेत्र म्हणून पाहण्याची पारंपरिक दृष्टी आता बदलण्याची गरज आहे. काजूच्या झाडांमध्ये आंबा, ऐन, किंजळ, हेद, धामण यांसारखे स्थानिक वृक्ष आणि नैसर्गिक फुलझाडे टिकवून ठेवली, तर हीच शेती पक्षी, फुलझाडे आणि परागीभवन करणार्‍या जीवांसाठी महत्त्वाचे अधिवास बनू शकते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातून याचे ठोस वैज्ञानिक संकेत मिळाले आहेत. ‘बायोट्रॅपिका’ या नियतकालिकात २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या नंदिता मधू, विशाल सडेकर, राजाह जयपाल आणि रोहित नानीवाडेकर यांच्या संशोधनात उत्तर पश्चिम घाटातील जंगल, स्थानिक वृक्ष असलेल्या काजूच्या बागा म्हणजेच ‘काजू अ‍ॅग्रोफॉरेस्ट’ आणि एकपिकी काजू लागवड यांची तुलना करण्यात आली आहे.
 
हा अभ्यास जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आला. हा कालावधी काजूच्या फुलोर्‍याशी जुळणारा होता. संशोधकांनी सिंधुदुर्गातील काजूच्या बागांचा जंगल आणि ‘काजू अ‍ॅग्रोफॉरेस्ट’मध्ये प्रत्येकी २५, तर एकपिकी काजू लागवडीत ५० अशा एकूण १०० ठिकाणांवर नमुने घेतले. या परिसरातील कमी उंचीची सदाहरित आणि आर्द्र पानझडी जंगले गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने काजूच्या लागवडीमध्ये रूपांतरित झाली आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी या भागात स्थानिक वृक्षांच्या सोबतीने काजू लावण्याची पद्धत होती; मात्र आता मोठ्या प्रमाणावर एकाच काजू पिकाची लागवड केली जात आहे. याच बदलामध्ये स्थानिक वृक्षांचे महत्त्व दडलेले आहे. काजूचे झाड वर्षभर फुलत नाही. साधारण डिसेंबरअखेर ते मार्चदरम्यान त्याचा फुलोरा असतो आणि जानेवारीअखेर ते फेब्रुवारीच्या सुरुवातीला तो सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. त्यामुळे एकपिकी काजू बागेत एका विशिष्ट काळात मोठ्या प्रमाणावर फुले उपलब्ध झाली, तरी त्यानंतर पक्ष्यांसाठी उपलब्ध असणारे पुष्पस्रोत झपाट्याने कमी होतात. संशोधनातही एकपिकी काजू बागांमध्ये फुलांची संख्या कालांतराने सर्वाधिक वेगाने घटल्याचे दिसले.
 
याउलट, स्थानिक वृक्ष असलेल्या काजूच्या बागेत वेगवेगळ्या प्रजातींची झाडे वेगवेगळ्या काळात फुलतात. त्यामुळे काजूचा फुलोरा संपल्यानंतरही पक्ष्यांना पर्यायी अन्नस्रोत मिळण्याची शयता वाढते. अभ्यासामध्ये किंजळ (Terminalia paniculata) आणि धामण (Grewia tiliifolia) यांसारख्या स्थानिक वृक्षांचे महत्त्व दिसून आले. तसेच मुरुडशेंग/केवण (Helicteres isora), वाघाटी (Moullava spicata) आणि धामण (Grewia tiliifolia) यांसारख्या वनस्पती बदललेल्या अधिवासांमध्ये पक्ष्यांसाठी महत्त्वाचे पुष्पस्रोत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. या फरकाचे सर्वाधिक प्रभावी प्रतिबिंब पक्ष्यांच्या संख्येत दिसून आले. या संशोधनात ३१ पक्षी प्रजाती आणि ४५ फुलझाडांच्या प्रजातींमधील एकूण ६३२ परस्परक्रिया नोंदवण्यात आल्या. त्यामध्ये पश्चिम घाटातील स्थानिक किरमिजी-पाठीचा सूर्यपक्षी (Crimson-backed Sunbird – Leptocoma minima) सर्वाधिक सक्रिय आढळला. या पक्ष्याच्या फुलांशी तब्बल २७४ परस्परक्रिया नोंदवण्यात आल्या. त्याखालोखाल जांभळा सूर्यपक्षी (Purple Sunbird – Cinnyris asiaticus) याच्या १२२ परस्परक्रिया नोंदल्या गेल्या. या दोन्ही सूर्यपक्ष्यांनी विविध फुलझाडांना मोठ्या प्रमाणात भेटी दिल्याने परिसरातील पक्षी-फूल परस्परसंबंध आणि परागीभवन प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे अभ्यासातून अधोरेखित झाले आहे. अधिक महत्त्वाचे म्हणजे फुलझाडांच्या प्रजातींची समृद्धता एकपिकी काजू बागांच्या तुलनेत जंगलात ६.५ पट आणि ‘काजू अ‍ॅग्रोफॉरेस्ट’मध्ये ५.२ पट अधिक होती. मधुरसाहारी पक्ष्यांची प्रजातीसमृद्धता आणि Hill-Shannon diversity मात्र ‘अ‍ॅग्रोफॉरेस्ट’मध्ये सर्वाधिक नोंदली गेली. जंगलात पक्षी-फूल परस्परक्रियांची विविधता सर्वाधिक होती. यातून एक महत्त्वाची बाब समोर येते, काजूच्या बागेत उभा असलेला स्थानिक वृक्ष हा ‘अनुत्पादक’ किंवा शेतीच्या आड येणारा वृक्ष नसून संपूर्ण कृषी परिसंस्थेचा घटक आहे. स्थानिक वृक्षांमुळे विविध फुलांचे स्रोत उपलब्ध होतात. त्या फुलांकडे पक्षी येतात. पक्षी फुलांमधील मधुरस घेताना परागकणांचे वहन करू शकतात. त्याचबरोबर अनेक मधुरसाहारी पक्षी केवळ मधावर अवलंबून नसून कीटक आणि फळेदेखील खातात. त्यामुळे स्थानिक वृक्ष असलेली बाग पक्ष्यांना अधिक विविध प्रकारची संसाधने उपलब्ध करून देऊ शकते. याचा अर्थ काजूची लागवड बंद करणे असा नाही; उलट काजूची शेती आणि स्थानिक जैवविविधता यांचा समतोल साधणे, हा या संशोधनातून पुढे येणारा महत्त्वाचा संदेश आहे. संशोधकांनी स्थानिक, पक्षी-परागीभवनाशी संबंधित वृक्ष काजू बागांच्या आत आणि कडेला लावण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मधुरसाहारी पक्ष्यांसाठी बाग अधिक अनुकूल होऊ शकते आणि मजबूत पक्षी-फूल समुदाय टिकण्यास मदत होऊ शकते.
 
काजूच्या बागांमध्ये स्थानिक वृक्ष जपण्यासाठी नऊ उपाय
 
काजूच्या बागांमध्ये स्थानिक वृक्षांचे संवर्धन केल्यास पक्षी आणि फुलांची विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी शेतकर्‍यांनी पुढील उपाय करावेत.
  • स्थानिक वृक्षांची सरसकट तोड टाळावी : नवीन काजू लागवड करताना सर्व नैसर्गिक वृक्ष न काढता निरोगी, फुले-फळे देणारे वृक्ष राखावेत.
  • फुलणारे स्थानिक वृक्ष जपावेत : काजूचा फुलोरा संपल्यानंतर पक्ष्यांना पर्यायी अन्न मिळण्यासाठी वेगवेगळ्या काळात फुलणार्‍या प्रजाती टिकवाव्यात.
  • बांधावर वृक्षांची पट्टी ठेवावी : बागेच्या सीमा, रस्ते आणि ओढ्यांच्या काठावर स्थानिक वृक्ष व फुलझाडे राखावीत.
  • हंगामनिहाय प्रजाती निवडाव्यात : वर्षातील वेगवेगळ्या महिन्यांत फुलणार्‍या स्थानिक वृक्षांचे मिश्रण असावे.
  • मोठे-जुने वृक्ष राखावेत : असे वृक्ष पक्ष्यांना अन्नासोबत आश्रय आणि अधिवासाची संरचनात्मक विविधता देऊ शकतात.
  • नैसर्गिक पुनरुत्पादनाला संधी द्यावी : बागेत आपोआप उगवणारी उपयुक्त स्थानिक रोपे सरसकट काढू नयेत.
  • एकपिकी लागवड टाळावी : काजूसोबत स्थानिक वृक्ष राखून ‘अ‍ॅग्रोफॉरेस्ट’ पद्धतीला प्राधान्य द्यावे. संशोधनात अशा बागांमध्ये मधुरसाहारी पक्ष्यांची विविधता सर्वाधिक आढळली.
  • पक्षी-परागीभवनाच्या वृक्षांना प्राधान्य द्यावे : पक्ष्यांना मधुरस देणार्‍या स्थानिक
  • फुलझाडांचे बागेत आणि कडेला संवर्धन करावे.
  • बागेच्या कडा अतिस्वच्छ करू नयेत : बांधावरील उपयुक्त स्थानिक झुडपे, वेली आणि फुलझाडे जपावीत. अभ्यासात बागांच्या कडेला असलेले पुष्पस्रोत मधुरसाहारी पक्ष्यांसाठी महत्त्वाचे आढळले.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर