महाराष्ट्रातील एसआयआरला मुदतवाढ; १२ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकतीची संधी

नोटीसधारकांच्या घरीच जाणार बीएलओ; वगळलेल्या मतदारांना नावनोंदणीची संधी

 
 

Maharashtra SIR 2026
 
मुंबई (Maharashtra SIR 2026): महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या विनंतीनंतर दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत दि.१२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच प्राप्त दावे, हरकती आणि बजावलेल्या नोटिसांवरील निर्णय घेण्याची मुदत दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. (Maharashtra SIR 2026)
 
एसआयआरदरम्यान ज्यांना नाव नकाशीकरणात नसल्याने किंवा तार्किक विसंगती आढळल्याने नोटीस बजावण्यात आली आहे, अशा मतदारांच्या घरी आता बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) भेट देणार आहेत. संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन ती निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ प्रणालीवर अपलोड केली जातील. त्यानंतर संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. (Maharashtra SIR 2026)
 
नोटीस बजावलेल्या प्रत्येक मतदाराला निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा सहायक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीतच सुनावणी घेतली जाणार असून, शक्यतो ती ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास मतदाराच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला त्याच्या वतीने सुनावणीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. ऑनलाइन सुनावणीची सुविधा अधिक सक्षम करण्याचेही निर्देश आयोगाने दिले आहेत. (Maharashtra SIR 2026)
 
एसआयआर प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही एसआयआरदरम्यान किंवा त्यानंतर मतदार यादीत नाव राहून गेलेल्या व्यक्तींना सातत्यपूर्ण अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेत नाव समाविष्ट करण्याची संधी आहे. त्यात तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचाही समावेश आहे. महाराष्ट्रासह संबंधित राज्यांतील मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना अशा मतदारांच्या नावनोंदणीसाठी विशेष मोहीम तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Maharashtra SIR 2026)
 
दरम्यान, गरजू, बेघर, कामगार तसेच रात्रीच्या निवारा केंद्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पुरेशी मदत केंद्रे आणि विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एसआयआरसाठी दावे-हरकतींची महाराष्ट्रातील मुदतवाढ आणि घरपोच कागदपत्र संकलनामुळे मतदारांना प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. (Maharashtra SIR 2026)
 
आयोगाच्या बैठकींचे अजेंडे यापुढे आगाऊ वितरित होणार
 
आयोगाच्या बैठकींचे अजेंडे यापुढे आगाऊ वितरित केले जाणार असून, बैठकीचे इतिवृत्तही जारी केले जाणार आहे. अधिकाऱ्यांचे वार्षिक कामगिरी मूल्यमापन अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी आयोगाची मंजुरी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. आयोगाने स्पष्ट केले की, बिहारसह २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर पूर्ण झाले असून, उर्वरित टप्प्यांमध्ये अंतिम मतदारसंख्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. (Maharashtra SIR 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर