एसटी सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य; ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी कार्ड सक्तीचे

१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डद्वारेच

      
 ST NCMC Card 
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी दि. १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना एनसीएमसी कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. (ST NCMC Card)
एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासनाच्या निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. (ST NCMC Card)
 
दि. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डद्वारेच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलत धारक प्रवाशांनी त्यापूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत एनसीएमसी कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची क्यूआर संकेतचिन्ह असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे. (ST NCMC Card)
 
विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्यूआर संकेतचिन्हयुक्त पावती वाहकाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रावर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड कार्यान्वित करून त्यामध्ये रक्कम भरणे आवश्यक आहे. (ST NCMC Card)
 
एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. एनसीएमसी कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी भीम संकेतस्थळावरील सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेले क्यूआर कोड भीम अपच्या माध्यमातून स्कॅन करून कार्डमध्ये रक्कम भरता येणार आहे. (ST NCMC Card)
 
दरम्यान, आधार कार्डवरील जैवमितीय नोंदीमध्ये बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने एनसीएमसी कार्ड प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी दि. १ ऑक्टोबरपूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. (ST NCMC Card)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर